कराड : पश्चिम महाराष्ट्रात सहकारी बँकांमध्ये सर्वांत मोठ्या असणाऱ्या ‘कराड अर्बन’चा पाया विस्तारत असून, ६७ शाखांमध्ये आणखी पाच शाखांची वाढ होताना, आता राज्यभर शाखाविस्तार अन् बँकेचा व्यवसाय सहा हजार कोटींपुढे नेण्याचा निर्धार कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अंगीकार अन् नेट बँकिगची प्रगत सुविधा दृष्टिपथात असल्याचे ते म्हणाले.
कराड अर्बन को-ऑप. बँकेच्या १०८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, बँक व्यवस्थापन मंडळाध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, बँकेचे कार्यकारी संचालक दिलीप गुरव, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे यांच्यासह संचालक व व्यवस्थापन मंडळ आणि सभासद उपस्थित होते.
डॉ. एरम यांनी बँकेची चौफेर प्रगती करताना, एनपीए शून्य पातळीच्या खाली राखण्यात यश आल्याबद्दल समाधान व्यक्त करून, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांची पूर्तता करत गत आर्थिक वर्षात बँकेने भांडवल पर्याप्तता प्रमाण १५.२७ टक्के राखले आहे. बँकेची तब्बल ६५१ कोटींची व्यवसाय वाढ झाली असून, बँकेने करोत्तर २६ कोटी ४७ लाखांचा निव्वळ नफा कमावला आहे. एकूण व्यवसायात १२.५ टक्क्यांची वाढ होताना, तो ५,८३७ कोटींचा झाला असल्याचे डॉ. एरम यांनी सांगितले. बँकेच्या प्रतिमेस बाधा आणणे आणि आर्थिक नुकसानीस जबाबदार ठरल्याप्रकरणी सात सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव त्यांनी मांडला. सभेने तो बहुमताने मंजूर केला.
सुभाषराव जोशी यांनी दिलीप गुरव यांच्या तीन दशकांतील योगदानाचा गुणगौरव करून, त्यांचा या सभेत कृतज्ञतापर सत्कार करण्यात येत असल्याचे सांगितले. संचालक मंडळाच्या शिफारशीने सभासदांना आठ टक्के लाभांश देण्याचा ठरावही जोशी यांनी मांडला. सभेने त्यास मंजुरी दिली.
कार्यकारी संचालकपदी दिलीप गुरव
सीए दिलीप गुरव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जवळपास तीन दशके बँकेच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत सुभाषराव जोशी यांनी दिलीप गुरव यांच्या बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नेमणुकीचा ठराव मांडला. तो टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला. या वेळी संचालक, सभासदांतर्फे दिलीप गुरव यांचा डॉ. सुभाष एरम व सुभाषराव जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.