कर्जत : वातावरणाचा प्रभाव तसा तुमचा स्वभाव बनतो. मन हे साठवणुकीचे केंद्र आहे. मन ही तिजोरी आहे, मनामध्ये गोष्टींचा संग्रह आहे. बघण्यातून व ऐकण्यातून मनावर परिणाम होतो. मेंदूतील प्रत्येक गोष्टींचा परिणाम शरीरावर होतो. मन म्हणजे विचार व संग्रह होय. डोक्यातील प्रत्येक गोष्टींचा परिणाम शरीरावर होतो. वाचन, व्यायाम व म्युझिक थेरपीने मन विकसित होऊ शकते. नव्वद टक्के आजार मानसिक असतात. विष आपले मेंदू तयार करीत असतो. ‘मन को मना करो’ हे तत्व अवलंबून, निडर आहे तो लीडर असतो, असे मत डॉ. राजमोहन काळे यांनी व्यक्त केले.

कर्मवीर जयंती सप्ताह व व्याख्यानमाला निमित्त महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिर व दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २९ सप्टेंबर पर्यंत कर्मवीर व्याख्यानमालेचे आयोजन शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले आहे. शनिवारी ‘मनाचे स्वास्थ्य व स्वविकास’ या विषयावरील व्याख्यानरुपी पहिले पुष्प इंटरनॅशनल माईंड ट्रेनर डॉ. राजमोहन काळे यांनी गुंफले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब साळुंके होते. ते म्हणाले की, प्रत्येकाने आपल्यातला स्व शोधावा. मन आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे. समाजाची मानसिकता बदललेली आहे. जिद्द बाळगा, वाचनाची आवड जोपासा, थोर व्यक्तींची चरित्रे वाचा. मोबाईलमध्ये वेळ वाया घालू नका. आजच आपले ध्येय निश्चित करा व त्या दिशेने प्रयत्न करण्याचा संदेश याप्रसंगी दिला.

या कार्यक्रमप्रसंगी उद्योजक भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी निर्णय घेताना तुम्हाला तुमचे मन जे सांगेल त्यावर ठामपणे विश्वास ठेवून पुढे वाटचाल करा. द्विधा मनस्थिती हा मोठा धोका आहे. यामुळे कोणताही निर्णय घेताना मन आणि मेंदू या दोघांचा सल्ला घेऊन वाटचाल करा.

या कार्यक्रमाला दीपक शिंदे, कैलास काळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, प्रा. प्रकाश धांडे, विजय तोरडमल, भूषण ढेरे, महादेव तांदळे, प्राचार्य राजकुमार चौरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागाचे उपप्राचार्य व सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. प्रमोद परदेशी, सूत्रसंचालन प्रा. राम काळे व प्रा. स्वप्निल म्हस्के तर आभार प्रा. भागवत यादव यांनी मानले.