पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे साधुंच्या हत्याकांडप्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांना पोलीस विभागातून बडतर्फ (डिसमिस) करण्यात आले आहे. तर सहाय्यक फौजदार रवी साळुंखे व वाहनचालक कॉन्स्टेबल नरेश धोडी यांनी सक्तीची सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१६ एप्रिल २०२० च्या रात्री झालेल्या या हत्याकांडात मुंबईहून सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रथम कारवाईत कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार रवी साळुंखे व दोन कॉन्स्टेबल यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. तर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. हे प्रकरण घडल्यानंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.

गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोप पत्र दाखल केले आहे व याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येत असून कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasa police incharge dismissed in gadchincle case aau
First published on: 30-08-2020 at 21:27 IST