मुंबई – गोवा महामार्गावरील बोगद्याचे काम सुरू

नैसर्गिकदृष्टय़ा धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील  प्रवास आता आरामदायी व कमी वेळेचा होणार आहे. या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम सुरू झाले आहे. या बोगद्यामुळे वाहनचालकांना वळणा वळणाच्या घाटातून गाडी नेण्याचीही कसरत करावी लागणार नाही. शिवाय ४० मिनिटांच्या या प्रवासाचे हेच अंतर केवळ ९ मिनिटांत कापता येणार आहे

रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते २६ जानेवारीला कामाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गाच्या इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्यातील चौपदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याच मार्गावर पोलादपूर ते खवटी असा कशेडी घाट आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा घाट महत्त्वाचा पण तितकाच धोकादायक मानला जातो. तो पार करण्यासाठी वाहनांना चाळीस मिनिटांचा कालावधी लागतो. या घाटातून प्रवास करताना वाहनांचे मोठय़ा प्रमाणात अपघात होत असतात. तर रसायनवाहू वाहने घाटात कलंडल्याने वाहतूक कोंडी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. पर्यटकांबरोबरच गणेशोत्सव व शिमगोत्सवात येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. तर पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या व घाटातील रस्ता खचण्याचे प्रकार घडत असल्याने हा घाट प्रवासासाठी असुरक्षित झाला आहे. अशा या कशेडी घाटाला पर्याय देण्यासाठी डोंगरातून बोगदा काढला जात असून पुढील अडीच वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या बोगद्यासाठी सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर बोगद्याचे काम रिलायन्सला इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी रुपये ५०२.१५ कोटी खर्च येणार असून पावणेदोन किलोमीटरचे एकदिशा मार्गाचे वाहतुकीसाठी दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन व येण्यासाठी तीन अशा एकूण सहा लेन असतील. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी चार वर्षे ठेकेदारावरच राहणार आहे. कशेडी बोगदा हा चौपदरीकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

‘कशेडी घाटात गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेले असून काहींना कायमचेच अपंगत्व आले आहे. परंतु बोगदा झाल्यानंतर अशा जीवघेण्या अपघातांना आळा बसेल व प्रवासाचा वेळही वाचणार आहे. चांगल्या मार्गामुळे कोकणात पर्यटनालाही चालना मिळेल.’

-रवींद्र वायकर (पालकमंत्री, रत्नागिरी)

‘कशेडी घाटाला पर्यायीची गरज होती ती बोगद्यामुळे लवकरच पूर्ण होईल.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– प्रदीप महाले (वाहन चालक)