महसूलमंत्री एकनाथ खडसे शिवसेनेविरुद्ध भुईमुगाच्या शेंगांवरून शरद पवार यांचीच भाषा बोलत आहेत. सत्तेमुळे त्यांना संवेदना राहिली नाही. शेंगा कुठे येतात यावर चर्चा करण्याऐवजी दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत जाहीर करा अन्यथा हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेनेचे नेते आमदार दिवाकर रावते, सुनील प्रभू, विजय शिवदरे, बालाजी किन्हीकर यांच्या पथकाने मंगळवारी जिल्ह्य़ात काही गावांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार बठकीत कदम यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब िपगळे आदी उपस्थित होते. कदम म्हणाले, की मराठवाडय़ासह अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत रस्त्यावर उतरली आहे. सरकार मात्र कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई-अहमदाबाद रेल्वेसाठी ४० हजार कोटी रुपये दिले. मग दुष्काळातील शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपये का देऊ नयेत? सरकारने आठ दिवसांत दुष्काळ जाहीर करुन वीजबिल माफीसह इतर सवलती द्याव्यात. कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी दहा, तर बागायती शेतकऱ्याला २५ हजार रुपये अनुदान द्यावे. येत्या ७ डिसेंबपर्यंत सरकारने या बाबत निर्णय न घेतल्यास नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लावून धरली होती. आता मुख्यमंत्री म्हणून हा निर्णय तत्काळ घ्यावा, असे सांगून मंत्री खडसे यांच्या विधानावर कदम म्हणाले, की शिवसेनेला शेतीतील काही कळत नाही, अशी भाषा राष्ट्रवादीचे शरद पवार बोलत असत. आता खडसे पवारांचीच भाषा बोलत असून ती निषेधार्ह आहे. भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात, यावर चर्चा करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2014 रोजी प्रकाशित
खडसे आता शरद पवारांची भाषा बोलत आहेत – कदम
महसूलमंत्री एकनाथ खडसे शिवसेनेविरुद्ध भुईमुगाच्या शेंगांवरून शरद पवार यांचीच भाषा बोलत आहेत. सत्तेमुळे त्यांना संवेदना राहिली नाही. - शिवसेना नेते रामदास कदम
First published on: 26-11-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khadse speak sharad pawars language