शिसवेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी तसेच पुणे आणि रत्नागिरी येथे ईडीची कारवाई सुरु आहे. या कारवाईनंतर राजकीय वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्याकडेही भाजपाच्या असंख्य लोकांविरोधात सबळ पुरावे आहेत, असे वक्तव्य करत भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला अशा वक्तव्यांची सवय झाली आहे, अशी खोचक टीका सोमय्या यांनी राऊतांवर केलीय.

हेही वाचा >>> “आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, या सर्व कारवाया…”, राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संजय राऊतांचं टीकास्त्र!

“आजच मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर दाखल केलेल्या १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची शिवडी कोर्टात सुनावणी झाली. मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवण्यात आला. संजय राऊत यांची बोलती बंद झाली. १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्याबद्दल १०० पैशांचे कागदपत्रं ते दाखवू शकलेले नाहीत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेला लुटायचं आहे. मंत्र्यांचे घोटाळे उघड झाले की अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची त्यांना सवय आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही याची सवय झाली आहे,” असा टोला सोमय्या यांनी राऊतांना लगावला.

हेही वाचा >>> अनिल परब यांच्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्या यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “त्यांनी कपड्यांची बॅग…”

तसेच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “उद्धव ठाकरे हे माफीया सेनेचे सरदार आहेत. लुटेरोंका सरदार तो डाकू होता आहे. म्हणून उद्धव ठाकरे आपल्या बाकीच्या सरदारांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत. मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या बंगल्यांचा घोटाळा बाहेर काढला आहे. उद्धव ठाकरे याविषयी एक शब्द बाहेर काढत नाहीत. ते अनिल परब यांना काय वाचवतील,” अशा शब्दांत सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.