भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत या भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर ६ जणांचे फटाके फोडणार असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये तीन मंत्री आणि तीन जावई असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यांनी (राष्ट्रवादीने आर्यन खान प्रकरणात) लवंगी फटाके फोडले, मात्र मी एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही सोमय्यांनी दावा केला. ठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केल्याचाही आरोप त्यांनी केला. मात्र या आरोपांना आता अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे.
सोमय्या काय म्हणाले?
“सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात तीन मंत्र्यांच्या तीन घोटाळ्यांचा आणि त्यांच्या तीन जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले,” असं सोमय्या म्हणाले. ते मलाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना बोलत होते.
ठाकरे सरकारला लाज वाटत नाही का?
“ठाकरे सरकारला लाज वाटत नाही का? हिंदूह्रदयसम्राटांचं नाव घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी आमचा विश्वासघात केला. नरेंद्र मोदींशी, भाजपशी विश्वासघात करा, पण हिंदू धर्म, संस्कृती आणि महाराष्ट्राशी विश्वासघात आम्ही खपवून घेणार नाही,” असा टोलाही सोमय्या यांनी लगावलाय.
पवारांवर टीका…
“समीर तू दलित नाही, तु मुस्लीम आहे. क्रांती रेडकर तुझा नवरा मुस्लीम आहे. त्याचं पहिलं लग्न नाही निकाह झाला होता. ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’, त्यांचा बाप नाही, ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. दाऊदचा संबंध कुणाशी आहे, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंय,” असंही सोमय्या म्हणालेत.
नवाब मलिकांचं उत्तर…
किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. आम्हाला काय धमक्या देताय? आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे, असं मलिक म्हणाले आहेत. “पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही. मी विधानसभेमध्ये जे प्रकरण समोर आणणार आहे त्यानंतर भाजपा कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाही हे मी आज पुन्हा एकदा सांगतो,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.