भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शोषित, पीडित आणि वंचितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समानतेचा लढा बाबासाहेबांनी लढला. बाबासाहेबांचा हा संघर्ष घराघरांत पोहोचवण्यामागे भीमगीतांचा देखील मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील भीमगीतांचा हाच वारसा डिजिटल पद्धतीने जपण्यासाठी माहितीपट निर्माते सोमनाथ वाघमारे आणि समाजप्रबोधक, शिक्षिका स्मिता राजमाने यांनी “द आंबेडकर एज डिजिटल बुकमोबाईल”चा प्रकल्प हाती घेतला आहे. डिजिटल बुकमोबाईलच्या माध्यमातून भीमगीते आणि ती गाणाऱ्या गायकांची माहिती लोकांना पाहायला आणि ऐकायला मिळते. याच माध्यमातून लोकशाहिर वामनदादा कर्डक यांच्या शिष्यांनाही डिजिटल बुकमोबाईलशी जोडता आले, असे स्मिता राजमाने यांनी सांगितले.

“ज्यावेळी या सर्व माहितीचे दस्तऐवजीकरण केले जात होते त्यावेळी महिलांपेक्षा पुरुष गायकांचे गट अधिक संपर्कात येत होते. त्यामुळे महिला गायिकांपर्यंत पोहोचणे आव्हानात्न होते. तेव्हा आम्ही औरंगाबादमधील चार महिला गटांची माहिती घेतली. या गटांतील दोन महिला गायिका या लोकशाहिर वामनदाद कर्डक यांच्या शिष्य होत्या. आतापर्यंत वामनदादांची गाणीच त्यांनी गायली आहेत”, अशी माहिती स्मिता राजमाने यांनी दिली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची समाजपरिवर्तनाची चळवळ लोकशाहिर वामनदादा कर्डक यांनी लोकांपर्यंत पोहोचवली. वामनदादा कर्डक यांचे भीमगीतांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील योगदान मोलाचे आहे. अशावेळी वामनदादा कर्डक यांच्यासह या चळवळीत भीमगीतांचा वारसा जपणाऱ्या त्यांच्या शिष्यांना डिजिटल बुकमोबाईलशी जोडता येणे खरोखरच महत्त्वाची बाब आहे.

भीमगीतांच फिरतं डिजिटल ग्रंथाल नेमकं काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील गाव खेड्यांमध्ये गायल्या जाणाऱ्या भीमगीतांचे डिजिटायझेशन करण्याचा अनोखा प्रकल्प सोमनाथ वाघमारे आणि स्मिता राजमाने यांनी हाती घेतला आहे. “द आंबेडकर एज डिजिटल बुकमोबाईल”च्या माध्यमातून भीमगीते आणि ती गाणाऱ्या गायकांची माहिती लोकांना पाहायला आणि ऐकायला मिळते. सोमनाथ हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन या गायकांची भेट घेतात व ही भीमगीते रेकॅार्ड करतात. त्यानंतर डिजिटल बुकमोबाईलमधील ही संपूर्ण माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. याची वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे. या भीमगीतांना आणि ती गाणाऱ्या गायकांनाही एक ओळख मिळावी. नव्या पिढिला त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने सोमनाथ आणि स्मिता यांचे काम सुरू आहे.