जिल्ह्य़ातील विधानसभेच्या १० मतदारसंघातील मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. आज  निवडणूक निरीक्षक के. प्रवीणकुमार, अजितसिंग पन्नू, दीपक सिंग, जिल्हाधिकारी राजाराम माने, अपर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या उपस्थितीत तयारीचा हा आढावा घेण्यात आला.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासंदर्भात यावेळी निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनास मार्गदर्शन केले. एका विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक उपस्थित असतो. त्यासाठी आवश्यक एकूण कर्मचाऱ्यांच्या १२० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार एका विधानसभा मतदारसंघासाठी १८ यानुसार एकूण १० विधानसभा मतदारसंघासाठी १८० कर्मचाऱ्यांच्या नावांची सरमिसळ करण्यात आली. त्यानुसार ज्या विधानसभा मतदारसंघासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ते उद्या शनिवारी दुपारी ३ वाजता मतमोजणीच्या ठिकाणी हजर होणार आहेत. यावेळी तहसीलदार वर्षां िशगण-पाटील, अजित चौगुले व निरीक्षकांचे संपर्क अधिकारी उपस्थित होते.