भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोिवद पानसरे यांच्या निधनामुळे शनिवारी शहरात सर्व व्यवहार बंद राहिले. अनेक ग्रामीण भागातही अशीच परिस्थित होती. व्यवहार बंद ठेवून कार्यकत्रे गटागटाने पानसरे अमर रहे अशा घोषणा देत दसरा चौकात जमत राहिले.
कॉ. पानसरे यांनी शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त रात्री सर्वाना समजले होते. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार बंद राहिले. व्यापारी कारखानदारांनी त्यांना अभिवादन करण्यासाठी कसलेही व्यवहार केले नाहीत. मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी, शाहूपुरी, गंगवेश, महाद्वार रोड अशा सर्वच ठिकाणी बंद सदृश्य परिस्थिती होती. पानसरे यांचे पार्थिव दुपारी एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारा विमान तळावर आणले तेथून मोटारीने पार्थिव दसरा चौकात आणण्यात आले. लाल पोशाख परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी पार्थिवाभोवती कडे केले होते. तेथे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य कार्यकर्त्यांनी पानसरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. श्रीमंत शाहूमहाराज, ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आव्हाड, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, निवृत न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील, भाकपचे राज्यसचिव डॉ. भालचंद्र कानगो आदींनी पार्थिवास पुष्पहार अर्पण केला. शहराच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकत्रे गटागटाने दाखल होत होते. त्यांच्या हातात पानसरे यांच्या प्रतिमा होत्या. पानसरेंना लाल सलाम अशा घोषणा दिल्या जात होत्या.
शहरात घरातील बहुतांशी चौकांमध्ये पानसरे यांना श्रध्दांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते. त्यावर नेहमीच्या आवेशात बोलणाऱ्या पानसरे यांच्या विविध रूपातील मुद्रा प्रसिध्द होत्या.