कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या भोंगळ, भ्रष्ट कारभाराबाबत सातत्याने आवाज उठवूनही कोणतीही कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोरच दगडाची पूजा करून ‘कोल्हापूर नेक्स्ट’च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.
नागरिकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर अधिकारी निरूत्तर झाल्यानंतर कोल्हापूर नेक्स्टचे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण, भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, विजयसिंह खाडे पाटील यांच्यासह तक्रारदार नागरिक, कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलले.

कोल्हापूर नेक्स्टच्या वतीने महापालिकेच्या भोंगळ, बेजबाबदार कारभाराबाबत विविध प्रकारे आवाज उठवला जात आहे. निवेदनातील मुद्द्यांवर वर्षभरात कोणतीच कारवाई न झाल्यामुळे आज नगररचना विभागात महा जनसुनावणी आयोजित केली होती. यावेळी अधिकारी यांनी दालनात येण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांना बाहेर उघड्यावरच सुनावणी घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.

अजित ठाणेकर यांनी या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगत आजवरच्या निवेदनाच्या अनुषंगाने कोणती कृती केली, अशी विचारणा केली. प्रभाकर कुलकर्णी, यशवंत माने, शेफाली मेहता, प्रसाद पाटील यांच्यासह नागरिकांनी आपल्या समस्या तसेच बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उडवाउडवीची उत्तरे अधिकारी देऊ लागल्याने कार्यकर्ते, नागरिक संतप्त झाले. नगररचनाकार विनय झगडे, सहायक नगर रचनाकार एन.एस. पाटील यांनी प्रलंबित कारवाया लवकर पूर्ण करू, असे आश्वासन दिले. संयम सुटलेल्या कार्यकर्त्यांनी अधिकारी यांच्या समोरच दगड ठेवून तुमच्यापेक्षा दगड बरा, असे म्हणून दगडाची हळद-कुंकू, हार घालून पूजा केली. पोलिसांनी तातडीने दगड बाजूला केले.