कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात एमआरआय सुविधेसह आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आराेग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून रुग्णालयातील दीर्घकालीन समस्या, आवश्यक साेयी-सुविधा व रुग्णसेवेतील अडीअडचणी आदी विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आराेग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली.
बैठकीत आमदार आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध हाेणे, औषधांचा पुरवठा व त्यासाठी आवश्यक निधीची तातडीने उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी केली. बैठकीस आराेग्य सेवा काेल्हापूर मंडळ उपसंचालक डाॅ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुप्रिया देशमुख, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. भाग्यरेखा पाटील, डाॅ. अमित साेहनी, संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.