लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा, पदयात्रा, वैयक्तिक संपर्क या माध्यमातून मंगळवारी करण्यात आली. गेले अनेक दिवस धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा सायंकाळी विसावल्या. अधिकृत प्रचार संपला असला तरी छुप्या प्रचाराला मात्र सुरूवात झाली आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात प्रमुख उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. तेंव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, महायुती, आम आदमी पक्ष, डाव्या पक्षांचे उमेदवार यांनी प्रचाराला हात घातला होता.राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक व काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर सभा पार पडली. तर शिवसेनेचे संजय मंडलिक व शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांची गांधी मैदानात तोफ धडाडली होती. या मोठय़ा सभा वगळता तालुकास्तरीय मेळावे, पदयात्रा, महिला मेळावे, युवक मेळावे, हळदी-कुंकू कार्यक्रम आदी विविध मार्गानी प्रचाराचे रान उठले होते.
मंगळवार हा प्रचाराचा अखेरचा दिवस होता. शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी सकाळी अभिनेते आदेश बांदेकर (भाऊजी) यांच्या समवेत महालक्ष्मीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली. शुक्रवार पेठ येथे झालेल्या महिला मेळाव्यात बांदेकर यांनी महिलांची मने जिंकली. त्यानंतर मंडलिक यांच्या पदयात्रेला सुरूवात झाली. एवती या गावात प्रचाराची सांगता झाली. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्या शहर व उपनगरात सात ते आठ ठिकाणी पदयात्रा पार पडल्या. गांधीनगर येथे पदयात्रेला सुरूवात झाली. कदमवाडी,सदरबझार, कसबा-बावडा, संभाजीनगर आदी भागात झालेल्या पदयात्रेत नगरसेवक, काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
‘आप’ ने मात्र प्रचाराची सांगता वेगळ्या पध्दतीने केली. रंकाळा बसस्थानकावर झाडू चलाओ अभियान या पक्षाच्यावतीने राबविण्यात आले. उमेदवार नारायण पोवार यांनी प्रवाशांची भेट घेत संवाद साधत राजकारणातील घाण दूर करण्याचे आवाहन केले. अमरदिप कुंडले, दिनेश रेडेकर, वैशाली कदम यांच्यासह कार्यकर्ते मोहिमेत सहभागी झाले होते.
खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी येथे भव्य पदयात्रा काढीत प्रचाराची सांगता केली. डेक्कन ते अर्बन बँक या बंद पडलेल्या संस्थांच्या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. नाटय़गृह चौकात झालेल्या सभेत राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर यांनी आवाडे यांच्या घराणेशाहीवर टीकास्त्र सोडले.
काँग्रेस पक्षाने शक्तीप्रदर्शन टाळीत इचलकरंजी काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. खासदार जयवंतराव आवळे, माजी खासदार निवेदिता माने, अशोक स्वामी, मदन कारंडे यांनी शेट्टी यांच्या अकार्यक्षमतेवर टीका केली. कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी शाहूवाडी येथे प्रचाराची सांगता केली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Apr 2014 रोजी प्रकाशित
सभा, पदयात्रा, वैयक्तिक संपर्कातून कोल्हापुरात प्रचाराची सांगता
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा, पदयात्रा, वैयक्तिक संपर्क या माध्यमातून मंगळवारी करण्यात आली. गेले अनेक दिवस धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा सायंकाळी विसावल्या.
First published on: 16-04-2014 at 03:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur promotions ended with meeting personal contacts