कोल्हापूर : कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत पहाटेपासून चार फूट वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात या मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.रात्री उशिरा दत्त मंदिरापर्यंत पुराचे पाणी येऊन ठेपले होते. पहाटेपासूनच पाणीपातळी वाढण्याची गती वाढल्याने दुपारी कृष्णेचे पाणी श्रींच्या चरणकमलास स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडून दक्षिणद्वार सोहळा सुरू झाला.
भाविकांची रीघ
कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, कोल्हापूर, जयसिंगपूर, मिरज, सांगलीसह सीमा भागातील शेकडो भाविकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला. दक्षिणद्वार झाल्याने श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली असून, येथेच महापूजा व अन्य नित्य कार्यक्रम पार पडत आहेत.
कोल्हापुरात शिवशंभोचा गजर
श्रावण महिन्यात भगवान शंकराची उपासना केली जाते. कोल्हापुरातील करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिर परिसर, टाऊन हॉल, उत्तरेश्वर, कैलासगडची स्वारी, तारकेश्वर आदी महादेव मंदिरांत पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव’चा गजर करीत पूजाअर्चा होत राहिली.