– आशुतोष जोशी

कोकण किनाऱ्यावरील स्थानिक जमातींच्या गीतांत पृथ्वीची लय असते आणि त्यांची वारसापद्धत ही वैयक्तिक लालसेपेक्षा सामुदायिक हिताला उच्च प्राधान्य देते. परंतु पर्यावरणीय समन्वयापेक्षा जीडीपीमधील वाढ अधिक महत्त्वाची समजणारे धोरणकर्ते या स्थानिक समाजांच्या शहाणपणाला ‘मागास’ असं लेबल लावून दुर्लक्षित करतात. मोठमोठे प्रस्तावित महामार्ग भारतातील पर्यावरणदृष्ट्या अतिशय नाजूक जंगलप्रदेशांतून जाणार आहेत. अगोदरच औद्योगिक प्रदूषणाने ग्रासलेल्या या प्रदेशास आणखी नव्या आणि वाढीव संकटांना त्यामुळं तोंड द्यावं लागेल. रासायनिक कारखान्यांनी खूप पूर्वीपासूनच नद्यांमध्ये विषारी द्रव्यं सोडायला सुरुवात केली आहे आणि जहाजबांधणी उद्योग समुद्रात तेल सांडत आहेत. या काही केवळ गैरसोयी नाहीत तर त्या आधीच डळमळणाऱ्या पर्यावरण संस्थेच्या अस्तित्वावरच घाला घालत आहेत.

ही हानी केवळ पर्यावरणापुरती मर्यादित नाही, तर ही भूमी कित्येक स्थानिक आदिवासी जमातींचं घर आहे आणि त्यांच्या संस्कृतींचे धागे निसर्गाच्या वस्त्रात असे गुंतले गेले आहेत की ते सहज उसवणं शक्य नाही. त्यांच्या कहाण्या, प्रथा आणि उपजीविका यांची मुळं जंगलांमध्ये आणि नद्यांत रुजलेली आहेत- आणि पिढ्यानुपिढ्या ही सामूहिक स्मृती पुढे पुढे देण्यात आलेली आहे. हे संबंध तोडणं याचा अर्थ एक जीवनपद्धतीच पुसून टाकणं – पिढ्यानुपिढ्या पुढे दिलेली सामूहिक स्मृती पुसून टाकणं आहे.

हेही वाचा – नव्या सरकारी संसारात ‘नांदा सौख्यभरे’

हे एक अतिशय बोचरं सत्य आहे : ‘सोय पाहाणं’ हे आपल्याला लागलेलं अत्यंत धोकादायक व्यसन आहे. आपल्याला अन्न गुंडाळायला प्लास्टिकचं आवरण लागतं, ऊर्जेसाठी जीवाश्मांची इंधनं लागतात त्यामुळे सरतेशेवटी निसर्ग म्हणजे ‘दैनंदिन जगण्यातील वास्तव’ न राहता फार तर, ‘सुट्टीच्या दिवशी जाण्याचे ठिकाण’ म्हणून शिल्लक राहतो. पर्यावरणीय स्मृतीभ्रंशाचा तडाखा बसलेले असे आपण सजीव आहोत आणि जोवर आपली मुळं आपल्याला आठवत नाहीत तोवर आपली हानीच होणार आहे.

प्रगतीची नवी व्याख्या

आपण प्रगतीचं मोजमाप महामार्गांच्या किंवा कारखान्यांच्या संख्येवरून न करता आपल्या नद्यांचं आरोग्य, आपल्या जंगलांचं चैतन्य आणि आपल्या समाजांतील लोकांतील काटकपणा यावरून केलं तर? शाश्वत विकासाचा कच्चा आराखडा कोकण किनारपट्टीकडे आहेच. तिथल्या नैसर्गिक सौंदर्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं जतन करून आपण निसर्ग- पर्यटनास प्रोत्साहन देऊ शकतो, त्यामुळे पर्यावरणाची अधिक काळजी घेतली जाऊन लोकांना उपजीविकाही मिळेल. येथील स्थानिक समुदायांच्या शहाणीवेचा अनुभव पाहुण्यांना येईल, येथील शाश्वत प्रथा त्यांना शिकायला मिळतील, आधुनिक जीवन फारच क्वचित निसर्गाशी जुळवून घ्यायला शिकवत असलं तरी त्याच निसर्गाशी त्यांना नव्याने जुळवून घेता येईल. हे काही आदर्शवादी स्वप्न नव्हे तर भविष्याकडे पाहणारी एक व्यवहार्य, सहजसाध्य दृष्टी आहे. यात निसर्गाचा बळी देऊन माणसाची भरभराट होणार नाही तर निसर्गाशी सुसंवाद साधूनच ती होईल.

शाश्वत भविष्याच्या दिशेने वाटचाल

मी याआधीही भारतात मोठा पायी प्रवास (अरबी समुद्रापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंतचा १८०० किमीचा ) केला आहे, त्यावर आधारित ‘जर्नी टु द ईस्ट’ हे पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. तो प्रवास करण्यापूर्वी आधुनिकतेच्या गुदमरून टाकणाऱ्या गोंगाटापासून पळून जायची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती. मला माझा देश समजून घ्यायचा होता आणि अंतिमतः मला स्वतःला समजून घ्यायचं होतं. त्यामुळे मी जीवनाच्या अत्यावश्यक गोष्टींकडे वळलो. कायमची टिकू शकेल अशी जीवनशैली, माझ्या पूर्वजांचं पुरातन शहाणपण आणि निसर्गाशी केलेलं मूक सख्य- या त्या अत्यावश्यक गोष्टी होत्या.

आताची माझी पदयात्रा काेकणासाठी आहे. मी प्रस्तावित रेवस-रेडी महामार्गावरून प्रवास सुरू केला, अलिबागला पोहोचलो आणि तिथून जो दिनक्रम सुरू झाला तो पदयात्रेच्या आजच्या (१३ डिसेंबर) एकोणिसाव्या दिवसापर्यंत सुरू आहे. हा प्रवास सावंतवाडीपर्यंत जाईल. आता पोहोचलो आहे हरिहरेश्वरला. हा निषेधाचा प्रवास नसून संवाद आणि शोधाचा प्रवास आहे. मी ग्रामस्थांना भेटतो आहे, ग्रामसभांत आणि पंचायतींच्या बैठकीत बसतो आहे. त्यांना विचारतो आहे की ‘कुठल्या प्रकारचं भविष्य तुम्ही पाहता आहात?’

हेही वाचा – भारतातील मानसिक आरोग्याचे धोरण आणि कायदे

ही काही माझी केवळ वैयक्तिक पदयात्रा नाही, तर हे एक आमंत्रणही आहे. जो कुणी निसर्गाचं मोल जाणतो, पश्चिम घाटाच्या सौंदर्याला दाद देतो, पुढे जाण्याचा अधिक चांगला मार्ग आहे, यावर विश्वास ठेवतो, त्या सर्वांना मी माझे सहप्रवासी होण्याची विनंती करतो. अगदी एक दिवस का होईना, माझ्यासोबत चाला. केवढं मोठं सौंदर्य पणाला लागलं आहे ते माझ्यासोबत पहा आणि मग प्रेम, आदर आणि टिकाऊपणा यात रुजलेला पर्यायी मार्ग मिळतो का ते आपण एकत्रपणे पाहू. वेंडेल बेरी मार्मिकपणे म्हणतात, ‘ही पृथ्वीच काय ती आपल्या सर्वांतली सामायिक चीज आहे.’ या साध्यासुध्या सत्याचा आदर करण्यास आपण फार उशीर करता कामा नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

studio@ashutoshjoshi.in ; इन्स्टाग्राम – @ashutoshjoshistudio