रत्नागिरी : भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युध्दजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. संपुर्ण जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर गस्त वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

भारत – पाकिस्तान या दोन देशात उद्भवलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे संपुर्ण कोकणात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण किनारपट्टीवरुन घुसखोरी होण्याच्या भितीने रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सावध झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस दलातील कर्मचा-यांच्या सूटट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना कामावर हजर होण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण पोलीस विभाग अलर्ट मोडवर असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. विशेषतः सागरकिनारी भागात गस्तीसाठी स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली असून सागरी सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सदस्यांनाही अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयित बोटी अथवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, तसेच सागरी सीमावर्ती भागांवर खास लक्ष ठेवण्यात येत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. नागरिकांनी कुठलीही संशयास्पद हालचाल, व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २३ मे २०२५ रोजीपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कला २१०/१)(२) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना तयारीत राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.