गोदावरीच्या लाभक्षेत्रातील हक्काच्या ११ टीएमसी पाण्यासाठी कोपरगावकरांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी येत्या दहा दिवसांत तसे लेखी कळवावे अन्यथा सर्वपक्षीय जेलभरो आंदोलनाने लढा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी येथे सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान बैठक संपताच जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी या संदर्भात उद्याच (शुक्रवारी) शिर्डी येथे तटकरे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन ज्येष्ठ नेते तथा सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे यांना दिले.
तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी येथील विश्रामगृहात सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अशोक काळे, भाजपचे विजय वहाडणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र परजणे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सैदुबाबा शेख, ज्येष्ठ संचालक लहानूभाऊ नागरे, रिपाइंचे दीपक गायकवाड आदी या बैठकीस उपस्थित होते.
कोपरगावच्या हक्काच्या पाटपाण्यासाठी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी जातीने लक्ष घालावे व हक्काचे अकरा टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत बैठक घ्यावी, अशी मागणी आमदार अशोक काळे यांनी लावून धरली. सिन्नर येथील इंडिया बुल्स वीजनिर्मिती कंपनीला उच्चाधिकारमंत्री समितीनेच साडेतीन टीएमसी पाणी मंजूर केले असून यात मूळ चुका शासनाच्याच आहेत असे सांगून काळे यांनी सरकारच्या कामाचे वाभाडे काढले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हक्काच्या पाटपाण्यासाठी सर्वपक्षीय लढय़ाचे स्वागत केले. दारणा, भंडारदरा आणि मुळा धरणांतून मराठवाडय़ाला प्रत्येकी तीन टीएमसी पाणी दिले, ते अडविण्यासाठी कुणीही एकत्रित रेटा दिला नाही. त्यामुळेच आजची नामुष्की ओढावल्याचे त्यांनी सांगितले.
महानंदचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, भाजप व वंदे मातरम् संघटनेचे अध्यक्ष विजय वहाडणे, ज्येष्ठ नेते लहानुभाऊ नागरे आदींची या वेळी भाषणे झाली. नागरे यांनी आपल्या पाण्यावर मराठवाडय़ाचा कवडीचाही हक्क नाही असा दावा केला. गंगापूर व दारणा ही धरणे जायकवाडीच्या कितीतरी आधी म्हणजे ब्रिटिशांच्या काळात झाल्याने त्यांचा या पाण्यावर हक्क प्रस्थापित होऊ शकत नाही असे ते म्हणाले.
शंकरराव कोल्हे यांनी या वेळी बोलताना गोदावरी कालव्याला आता पावसाळ्यातही पाणी मिळणार नाही हे सुरुवातीलाच स्पष्ट केले. ते म्हणाले, इंडिया बुल्सला नाशिकचे सांडपाणी देण्याचा जो करार शासनाने केला आहे तोच मुळात चुकीचा आहे. एवढे सांडपाणी निघतच नाही. समन्यायी पाटपाणी वाटपासंदर्भात नेमलेल्या मेंढेगिरी समितीवर आमचा विश्वास नाही. या समितीच्या विरोधात आम्ही न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे सांगून सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी महिला, मुला-बाळांसह रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारू व हक्काचे पाणी मिळवू, त्यासाठी जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्र्यांनी आमच्याबरोबर राहून सरकार दरबारी दबाव वाढवावा असे आवाहन कोल्हे यांनी केले.
रुसवे फुगवे
पाटपाण्याच्या प्रश्नात ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रित आणले, मात्र त्यांनी स्वयंघोषित समिती करून अध्यक्षपद स्वत:कडेच ठेवले, याबाबत आ. काळे यांनी नाराजी व्यक्त केली. काळे यांची रस्ता रोकोसाठी तयारी नव्हती. त्यांनी मंत्री तटकरे तसेच मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे जाऊन प्रश्न सोडवावा हा आग्रह धरला. तटकरे उद्या (शुक्रवार) शिर्डीत येत आहेत, त्यांना भेटून आपली मागणी सांगू, असा आग्रह धरीत कोल्हे गाडीतून उतरून अशोक काळेंजवळ जात ‘या प्रश्नी आपण एकच असल्याचे’ सांगत हस्तांदोलन केले. त्यानंतर काळे यांनी कोल्हेंच्या प्रस्तावास संमती दिली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2013 रोजी प्रकाशित
हक्काच्या ११ टीएमसी पाण्यासाठी सरकारला निर्वाणीचा इशारा कोपरगावला सर्वपक्षीय बैठक
गोदावरीच्या लाभक्षेत्रातील हक्काच्या ११ टीएमसी पाण्यासाठी कोपरगावकरांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी येत्या दहा दिवसांत तसे लेखी कळवावे अन्यथा सर्वपक्षीय जेलभरो आंदोलनाने लढा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी येथे सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

First published on: 28-06-2013 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kopargaon public claims for 11 tmc water forewarning to government