कराड : कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे आज बुधवारी दुपारी १२ वाजता दीड फुटावरून साडेतीन फुटांपर्यंत उघडून कोयना नदीपात्रातील प्रतिसेकंद ३ हजार ४०० क्युसेकचा (घनफूट) जलविसर्ग ९ हजार ३०० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. तर, धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद २ हजार १०० क्युसेक जलविसर्ग सुरूच असल्याने धरणातून एकंदर ११ हजार ४०० क्युसेकचा जलविसर्ग झाला आहे. कोयना पाणलोटात तुफान पाऊस ओसरला असलातरी दमदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने धरणाच्या दरवाजातील विसर्ग वाढणार आहे.

कोयनेच्या दरवाजातून काल मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून ३ हजार ४०० क्युसेकचा जलविसर्ग सुरू करण्यात आला. जुलैच्या मध्यावर जलविसर्ग करण्याची ही पहिलीच वेळ होती. आता धरणक्षेत्रातील जोरदार पावसाने या जलविसर्गात आणि कृष्णा- कोयना नद्यांच्या पाणीपातळीतही वाढणार असल्याने या दोन्ही नद्यांकाठच्या लोकांना खबरदारीचा इशारा देताना, शासकीय यंत्रणाही समन्वयातून सतर्क राहिली आहे.

सध्या कोयना धरणाचा जलसाठा १,५४ टीएमसीने वाढून ७७.४० टीएमसी (धरण क्षमतेच्या ७३.५४ टक्के) झाला आहे. धरणातील पाण्याची आवक काहीशी घटून प्रतिसेकंद १७ हजार ९०६ क्युसेक झाली आहे. आवक पाण्याचा अंदाज घेत धरणातील जलविसर्ग करण्यात येणार असल्याने धरणाच्या दरवाजातील विसर्ग आणि त्याखालील कृष्णा- कोयना नद्यांची पाणीपातळी वाढणार असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोयना पाणलोटात दोन- चार दिवसांची ओढ घेवून परवा सोमवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार पाऊस सक्रिय झाला आहे. आज बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना पाणलोटात ५१.३३ मिमी पाऊस कोसळला आहे. कोयना पाणलोटात आजवर सरासरी २ हजार ३५१.३३ मिमी (वार्षिक सरासरीच्या ४७.०२ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम घाट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात तुरळक पाऊस झाल्याचे दिसते आहे.