कराड : कोयना धरणाच्या एक जूनपासून सुरू झालेल्या जलवर्षात, गेल्या ९२ दिवसांत धरणात १४८.७३ टीएमसी (१४३.३१ टक्के) पाण्याची भरघोस आवक होताना, कोयनेचा धरणसाठा नियंत्रणासाठी सहा वक्री दरवाजे तब्बल पाच वेळा उघडून विनावापर ४८ टीएमसी तर, पायथा वीजगृहातून नऊ टीएमसी असा ५७ टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे.

पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना पाणलोटात मान्सूनपूर्व तुफान, तर चालू पावसाळी हंगामात दमदार ते जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याचा सुकाळ दिसत आहे. सध्या सर्वच धरणांचे जलसाठे काठोकाठ भरून वाहताना दिसत आहेत. कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा या प्रमुख नद्यांसह बहुतेक उपनद्यांना सुध्दा पूर येऊन गेला आहे. मात्र, अतिपावसाचा खरीप पिकांना प्रचंड फटका बसला आहे. खरिप हंगाम लांबताना शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. या प्रमाणापेक्षा जास्त पावसाचा खरिप पिकांवर दुष्परिणाम होताना, उत्पादन घटताना त्याचा दर्जाही खालावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कोयना शिवसागरासह बहुतेक धरणे कधीच भरून वाहिली असून, पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर झाले आहे. मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने अवर्षणग्रस्त माणदेशसह अन्य प्रदेशातही पाणीच पाणी झाल्याने दुष्काळी जनताही सुखावली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा पाऊस कमीच

कोयना पाणलोटात बक्कळ पावसाचे चित्र असले, तरी हा पाऊस गेल्या वर्षीपेक्षा कमीच असून, या दोन्ही वर्षांत कृष्णा, कोयना नद्यांना पूर येऊन गेला आहे. यंदा कोयना पाणलोटात मागील तीन महिन्यांत ४,८६९.६६ मिमी (वार्षिक सरासरीच्या ९७.३९ टक्के) असा भरघोस पाऊस झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा हा पाऊस कमीच असून, गतवर्षी हाच पाऊस ५,४९७.६६ मिमी (वार्षिक सरासरीच्या १०९.९५ टक्के) नोंदला गेला होता.

यंदा नवजाला सर्वाधिक ५,२६५ मिमी, खालोखाल महाबळेश्वरला ५,०६६ मिमी, तर कोयनानगरला ४,२७८ मिमी पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी नवजाला सर्वाधिक ५,८६५ मिमी, खालोखाल महाबळेश्वरला ५,६३५ मिमी, तर कोयनानगरला ४,९९३ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत कोयना धरणाचे दरवाजे पाच वेळा उघडावे लागले, तर गतवर्षी ते आतापर्यंत दोनदा उघडले गेले होते. सध्या कोयनेचा धरणसाठा १०२.३३ टीएमसी (९७.२३ टक्के) असून, गतवर्षी हाच धरणसाठा १०३.९५ टीएमसी (९८.८३ टक्के) राहिला होता. यंदा कमी कालावधीत ज्यादा पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढवताना त्याची एकच चर्चा झाली आहे.

कोयनेतून ५३६ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

कोयना धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला असलातरी कोयना जलविद्युत प्रकल्पातून  ३१,२६५ दशलक्ष युनिट अधिकची वीजनिर्मिती झाली आहे.  गेल्या ९२ दिवसात ५३६ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. ज्यादा वीजनिर्मितीचा महाराष्ट्र राज्याला मोठा फायदा होणार आहे.