​सावंतवाडी : कुडाळ एमआयडीसीमधील वर्षानुवर्षे पडीक असलेल्या भूखंडांवर कोणताही उद्योग न उभारलेल्या भूखंडधारकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे थेट आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. ‘वर्षानुवर्षे भूखंड पडीक ठेवून त्यावर उद्योग का उभारला नाही?’ याचे खुलासे मागवून घ्यावेत आणि ज्यांचे खुलासे योग्य नसतील, त्यांचे भूखंड काढून घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश मंत्री सामंत यांनी दिले आहेत.

​कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कुडाळ एमआयडीसीमधील भूखंड वर्षानुवर्षे अडवून ठेवणाऱ्यांना ४८ तासांत खुलासे मागवण्याचे आणि योग्य खुलासा न आल्यास भूखंड काढून घेण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी दिले आहेत.

आडाळी एमआयडीसीमधील ३४ हेक्टर जमीन अजूनही एमआयडीसीच्या ताब्यात आलेली नाही. या ‘गायब’ जमिनीचा शोध घेऊन लवकरच उद्योजकांना भूखंड वितरित केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. भूखंड खरेदी केलेल्या उद्योजकांना वाढीव कालावधी दिला जाईल.

​कुडाळ एमआयडीसीला ३७ कोटींचा निधी

मंत्री उदय सामंत यांनी कुडाळ एमआयडीसीसाठी ३७ कोटींचा निधी दिला असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे गेल्या तीन वर्षांत ७० नवीन उद्योग कुडाळ एमआयडीसीमध्ये आले आहेत. यापूर्वी दरवर्षी सुमारे २५ उद्योग बंद होत होते, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी दिली.

मंत्री सामंत यांनी एमआयडीसीमध्ये केलेल्या मोलाच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. ​उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार उद्योजक हणमंतराव गायकवाड आणि आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

​यावेळी उद्योजक हणमंतराव गायकवाड, आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, माजी आमदार राजन तेली, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव ॲड. नकुल पार्सेकर, आनंद बांदिवडेकर, अमित वळंजू, आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. नकुल पार्सेकर यांनी मानपत्राचे वाचन केले.

असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात, मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकाळात एमआयडीसीमध्ये झालेल्या विविध कामांचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी कुडाळ एमआयडीसीमधील क्रीडा संकुलाची मागणी देखील अधोरेखित केली. मोहन होडावडेकर यांच्या भाषणातील पडीक भूखंडांच्या मुद्द्याचा धागा पकडून मंत्री सामंत यांनी भूखंडधारकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.