Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह गाणं म्हटलेला कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भोलीसी सुरत या गाण्याच्या चालीवर ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी.. असं विडंबनात्मक गाणं रचत कुणाल कामराने एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. आता कुणाल कामराने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्याची पोस्ट चर्चेत आली आहे.
काय आहे कुणाल कामराची पोस्ट?
कुणाल कामराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत म्हटलं आहे की, “माझी औकात नसेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला तुम्ही का सांगत नाही? माझा शो जर चार लोकही बघत नसतील तर माझ्याकडे दुर्लक्ष का करत नाही? ऑक्टोबर महिन्यात मी नाशिक, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी शो घेणार आहे. तुम्ही माझ्याबाबत जे बोललात ते योग्यच होतं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगता आलं तर बघा.”
कुणाल कामराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
इंडियन एक्स्प्रेसच्या एक्स्प्रेस अड्डाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. या मुलाखतीत त्यांना कुणाल कामरासह कॉमेडियन्स बाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला जर विचाराल तर राजकीयदृष्ट्या मी इतकंच सांगेन की अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं. या लोकांची औकात नाही, तुम्ही त्यांची औकात वाढवता. राजकीयदृष्ट्या अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं. पण अनेकदा काय होतं आमचा भाजपा हा पक्ष असो किंवा आमचे सहकारी पक्ष असोत, खासकरुन शिवसेना आणि भाजपा हे भावनिक पक्ष आहेत. त्यातून कधी कधी प्रतिक्रिया दिल्या जातात. माझ्या मते तरी प्रतिक्रिया येतात म्हणून अशा लोकांना जास्त महत्व मिळतं. खरंतर चार लोकही अशा लोकांना ऐकत नाहीत.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता कुणाल कामरावर टीका केली होती.
आता कुणाल कामराने एक्स्प्रेस अड्डाचा हाच व्हिडीओ पोस्ट करत मी लवकरच शो घेणार आहे असं देवेंद्र फडणवीसांनाच सांगितलं आहे. आपण मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी शो घेणार असल्याचं त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करुन सांगितलं आहे. आता कुणाल कामरा महाराष्ट्रात जेव्हा शो घेईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांबाबतही काही विडंबन करणार का? ही पोस्ट म्हणजे त्याची सुरुवात आहे का? अशा काही चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.