|| ज्योती तिरपुडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध अभ्यासातून केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष

विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेतो, त्या शाळेतील वातावरण कसे आहे, यावरून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते.  किशोरवयीन मुलांमधील अपराध, तणाव, आत्महत्येचे विचार त्यांना मिळणाऱ्या शालेय वातावरणामुळे उत्पन्न होतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभागांतर्गत हे संशोधन करण्यात आले.

मुलांना कुठल्या शाळेत, कुठल्या मंडळात प्रवेश द्यायचा यापेक्षा त्या शाळेचे वातावरण बघायला हवे. कारण, हे वातावरणच मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर जास्त प्रभाव टाकते, असे अमृता गोखले यांनी केलेल्या या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयबी आणि आयसीएसई या चारही शिक्षण मंडळांचा यात विचार करण्यात आला. त्यातही सात तासांची नियमित शाळा, निमनिवासी शाळा म्हणजे १२ तास शाळेत, निवासी शाळा आणि मिल्ट्री कॅन्टोन्मेंटची शाळा! अशा वेगवेगळ्या वातावरणात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास, मानसिक विकार, भावनिक परिपक्वता आणि सामाजिक परिपक्वता या चार गोष्टींवर शाळेच्या वातावरणाचा वेगवेगळा परिणाम झाल्याचे संशोधक अमृता गोखले यांनी सांगितले.

शाळेत मानसिक तपासणी का नाही?

शारीरिक तपासणी शिबिरे आयोजित करणाऱ्या शाळा आहेत. पण, एकही शाळा मुलांच्या मानसिक विकासासंदर्भात तपासणी करताना आढळत नाही. शाळा असे करण्यात घाबरतात की पालकांच्या दबावामुळे शाळा तसे करण्यात धजावत नाहीत, हा प्रश्न कायम आहे. दुसरी बाब म्हणजे, पालकांनी मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे पालक सभेला आलेले पालक त्याचा प्रगती अहवाल पाहून तेथेच मुलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात.

शिक्षण मंडळाचा तुलनात्मक अभ्यास

निवासी शाळांमध्ये मुलांच्या बुद्धीचा विकास चांगला दिसून आला. कारण सतत शिक्षकांचा सहवास असतो. मात्र, या मुलांमध्ये भावनिक किंवा सामाजिक परिपक्वतेचा अभाव आढळला.   मुलांचा बहुआयामी विकास हा राज्य मंडळाच्या शाळेतील मुलांमध्ये दिसून आला. याशिवाय भावनिक परिपक्वता राज्य मंडळाच्या शाळेतील मुलांमध्ये चांगल्याप्रकारे आढळली. याशिवाय  परिपक्वताही राज्य मंडळाच्या शाळांतील मुलांमध्ये दिसून आली. त्या तुलनेत केंद्रीय विद्यालयातील मुले शिक्षकांच्या नियंत्रणाच्या बाहेर असल्याचे आणि त्यासाठी शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्या हे कारण असल्याचे या संशोधनता समोर आले.

आजूबाजूच्या किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या समस्या, बालअपराध, किशोर अपराध किंवा आत्महत्येचे प्रमाण दिसून येत आहे. पालनपोषण, आरोग्याच्या समस्या, जीवनसत्त्वाचा अभाव, नैराश्य, ताणतणाव हे प्रकार १२ ते १६ वयोगटातील मुलांमध्ये वाढत आहेत. त्यासाठी शाळा आणि घर हे दोन निकष लक्षात घेऊन सामाजिक संवाद या दोन समस्यांचा विचार या अनुषंगाने केला असता शाळा अभ्यासक्रम, शाळेचा कालावधी, व्यवस्थापनाची ध्येय धोरणे, कोणत्या पद्धतीने त्यांना पुढे जायचे आहे (गुणवत्तेने की केवळ नफा कमावणे), शिक्षक व प्राचार्य काही शैक्षणिक मूल्य घेऊन आले की इतर नोकरी मिळत नाही म्हणून आलेत. सुशिक्षित, अध्यापनाच्या कामाप्रती तत्पर आहेत, याचा विचार या संशोधनात करण्यात आला.           – अमृता गोखले, संशोधक, पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of personality development in maharashtra students
First published on: 25-08-2018 at 01:11 IST