जिल्ह्यातील ४९ गावातील ८५० हेक्टर जमीन

नगर: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे’ या महामार्गाच्या कामास गती देण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. या महामार्गसाठी भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली असून पुढील महिन्यात भूसंपादनासाठी जमीन मालकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुरत ते नगर असा ३०० किमीचा महामार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी नगर जिल्ह्यतील, चार तालुक्यातील ४९ गावांतील ८५० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून ही माहिती देण्यात आली. हा सहापदरी महामार्ग नगर जिल्ह्यतून ९८.५ किमी जात आहे. महामार्गासाठी ७० मीटर रुंदीचे जमीन संपादित केले जाणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यतील पाच महामार्गांना छेद देऊन जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी सर्कल निर्माण केले जातील. वांबोरी घाटात हा महामार्ग दरीत ३० ते ४० मीटर उंचीचे खांब उभारून नेला जाणार आहे. त्यामुळे डोंगर फोडावे लागणार नाहीत.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सन २०१९ मध्ये सुरत—नाशिक—नगर—सोलापूर—हैदराबाद मार्गे चेन्नई पोर्ट या महामार्गाची घोषणा केली. गुगल सर्वेक्षणाद्वारे जमीन संपादनासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे, त्याचे नकाशे तयार करण्याचे काम सुरू आहे. भूसंपादनाची ३(ए) अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुढील महिन्यात जमीन मालकांना मोजणीसाठी उपस्थित राहण्याच्या ३ (बी) अन्वये नोटिसा जारी केल्या जातील. नाशिकमधील वनजमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर अखेपर्यंत नगर पर्यंतचे भूसंपादन पूर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा मानस आहे. सुरत ते नगर हे अंतर ३०० किमी. आहे.

संगमनेर तालुक्यातील १८, राहता तालुक्यातील ५, राहुरीतील २४ व नगर तालुक्यातील ९ गावातील ८५० हेक्टरचे संपादन केले जाणार आहे. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्गे—वांबोरी पुढे नगर शहराजवळील चांदबीबी महालाजवळून सोलापूरकडे हा महामार्ग जाईल. या महामार्गामुळे सुरत ते सोलापूर हे अंतर सुमारे १०० किमीने कमी, तर चेन्नईपर्यंतचे अंतर ३०० किमीने कमी होणार आहे. उत्तर व दक्षिण भारतातील विविध शहरे या माध्यमातून जोडली जाणार आहेत.

जिल्ह्यातून जाणारा महामार्ग

  • नगर जिल्ह्यतील लांबी ९८.५ किमी.
  • संगमनेर, राहाता, राहुरी व नगर या चार तालुक्यातून महामार्ग जाणार.
  • ४९ गावातील ८५० हेक्टर जमिनीचे संपादन.
  • ७० मीटर रुंदीच्या जमिनीचे संपादन.
  • वांबोरी घाटात ३० ते ४० मीटर उंचीचे खांब उभारून महामार्ग जाणार.

नगर ते सोलापूर या ‘ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे’ रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना केंद्रीय मंत्रालयाने दिल्या आहेत. त्याचबरोबर कामास मंजुरी मिळाल्याने भूसंपादनाचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. सन २०२१ अखेरीपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सन २०२२—२३ मध्ये या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. सुरत ते नगर या केवळ रस्त्याच्या कामासाठी एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

—प्रफुल्ल दिवाण, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर.