हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : रायगड जिल्ह्यात जमिनींचे व्यवहार पुन्हा जोरात सुरू झाले आहेत. या व्यवहारातून जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल ९ हजार १३४ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क जमा झाले आहे. गेल्या वर्षभरात १ लाख २६ हजार २९९ दस्तांची नोंदणी झाली असून यातून विक्रमी २ हजार १६१ रोची रुपयांचा मुद्रांक शुल्क शासनजमा झाले आहे.

करोना प्रादुर्भाव सुरु झाल्यामुळे मार्च २० मध्ये देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली, याचा फटका दस्त नोंदणीलाही बसला. दस्त नोंदणी ठप्प होती. बांधकाम व्यवसायावरही मंदीचे सावट होते. जमिनींचे व्यवहार ठप्प झाले होते. राज्यावर मंदीचे सावट पसरले होते. राज्याच्या महसुलात मोठी तूट आली होती. आता मात्र हे मळभ दूर झाल्याचे दिसून येत असून जागा जमिनींचे व्यवहार जोमाने सुरू झाले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली आहे.

जिल्ह्यात सन २०१९-२० या वर्षांत दस्त नोंदणीतून १ हजार ७४३ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क जमा झाला होता. २०२०-२१ मध्ये यात करोना निर्बंधामुळे जागा जमिनींचे व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे जागा जमिनींच्या व्यवहारातून मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली. वर्षभरात १ हजार ४७० कोटींचा मुद्रांक शुल्क जमा झाला. म्हणजेच १९-२० या आर्थिक वर्षांच्या तुलनेत २०-२१ मध्ये मुद्रांक शुल्काच्या महसुलात ३०० कोटी रुपयांची घट पाहायला मिळाली. त्यामुळे शासनाने रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवून मुद्रांक शुल्कात कपात केली होती. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. दस्त नोंदणीला पुन्हा चालना मिळाली. २०२१-२२ या कालावधीत सुधारली. जिल्ह्यात वर्षभरात २ हजार १६१ विक्रमी मुद्रांक शुल्क जमा झाला.

पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, अलिबाग, पेण आणि रोहा तालुक्यात जागा जमिनींचे व्यवहार वाढले आहेत. बांधकाम व्यवसायावरचे मंदीचे सावट बऱ्याच प्रमाणात दूर झाले आहे. बांधकाम व्यवसायाशी निगडित कंपन्याही तेजीत आल्या आहे. या व्यवसायाशी निगडीत असलेल्या मजुरांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.

* मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली. विकेंण्ड होम डेस्टीनेशन म्हणूनही अलिबाग, तर फार्महाऊस डेस्टीनेशन म्हणून कर्जत खालापूर परीसराला पसंती मिळत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनीही रायगड जिल्ह्यात मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतले आहेत.

* महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पात वर्षभरात गृहखरेदीचे प्रमाण चांगले आहे. अलिबाग परीसरात क्रिकेटपटू रोहीत शर्मा, अभिनेता रणवीर सिंग, दिपिका पादूकोण, डिमार्ट गृप राधाकृष्ण दमानी यांनी अलिबाग परिसरात कोटय़वधी रुपयांच्या जागा जमिनी खरेदी केल्या आहेत. हिरानंदानी प्रकल्पानेही नागाव परीसरात मोठा प्रकल्प हाती घेतला आहे.

करोना काळात आलेले मंदीचे सावट यामुळे हळुहळू दूर झाले आहे. या परिसरातील पायाभूत सुविधाही विकसित झाल्या आहेत. गुंतवणूकदारांचा ओढा रायगड जिल्ह्याकडे आहे. त्यामुळे दस्त नोंदणीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.

अ‍ॅड. प्रथमेश पाटील

वर्ष           दस्त नोंदणी संख्या      मुद्रांक शुल्क    जमा (कोटीत)

२०१७-१८             १ लाख १० हजार       ५१५          १७८५ 

२०१८-१९             १ लाख १४ हजार       ८५०          १९७८

२०१९-२०             १ लाख ०९ हजार       ७४१          १७४३

२०२०-२१            १ लाख ०२ हजार       ३३६          १४७०

२०२१-२२             १ लाख २६ हजार       २९९          २१६१