तालुक्यातील ढवळपुरी येथील देवस्थानच्या जमिनींच्या वहिवाटदारांची नावे कोणतेही कारण न देता कमी करून तब्बल १३७ एकर जमिनीची विक्री करण्याचा घाट देवस्थानच्या विश्वस्तांनी घातला आहे. याप्रकरणी महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी, मंडलाधिकारी तसेच तलाठी यांच्याकडून मोठा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप वहिवाटदार शेतक-यांनी केला असून या बेकायदेशीर नोंदी रद्द करून वहिवाटदरांची नावे सातबारावर न लावल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
ढवळपुरी येथील गावडेवाडी, वाघवाडी या शिवारात गट नंबर ५६६, ५६०/१ व ५६०/२ मध्ये लक्ष्मीनारायण व विष्णू मंदिराच्या जमिनी आहेत. सन १९४२ पासून या जमिनी तेथील शेतक-यांकडे वहिवाटीस आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वहिवाट करीत असल्याने संबंधित शेतक-यांनी तेथे त्यांची पक्की घरे तसेच शेतीच्या विकासासाठी विहिरीही खोदल्या आहेत. हे शेतकरी देवस्थानच्या जमिनींचे वहिवाटदार असल्याच्या नोंदी सातबा-यासह इतर दस्तऐवजांवर आहेत.
गेल्या काही वर्षांत जमिनींचे भाव गगनाला भिडल्यानंतर पुणे जिल्ह्य़ातील एका भूमाफियाने देवस्थानच्या विश्वस्तांशी संगनमत करीत महसूल तसेच भूमी अभिलेखच्या अधिका-यांशी सूत जुळवून सर्वच कुळांची नावे परस्पर सातबारावरून कमी केली. पूर्वी रीत दोनची असलेली ही जमीन खालसा करण्यात आल्याची नोंद करून विश्वस्तांची नावे लावण्यात आल्याचे कुळांकडे असलेल्या कागदपत्रांवरून दिसते.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राम शिंदे उद्या (मंगळवारी) विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने तालुक्यात येत आहेत. महसूल विभागाच्या या भ्रष्ट कारभाराची जंत्री अन्याय झालेले शेतकरी त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व पूर्वीपासून असलेल्या सातबारावरील नोंदी पुन्हा करण्यात याव्यात यासाठी हे शेतकरी पालकमंत्र्यांना साकडे घालणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2015 रोजी प्रकाशित
१३७ एकर जमिनीचा घोटाळा?
तालुक्यातील ढवळपुरी येथील देवस्थानच्या जमिनींच्या वहिवाटदारांची नावे कोणतेही कारण न देता कमी करून तब्बल १३७ एकर जमिनीची विक्री करण्याचा घाट देवस्थानच्या विश्वस्तांनी घातला आहे.

First published on: 20-01-2015 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land scam of 137 acres