भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरीश बापट यांना अखेरचा निरोप देताना पुण्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांना, तसंच उपस्थित असलेल्या नेत्यांना अश्रू अनावर झाले होते.खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आज सकाळी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी ६ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. तर काही वेळापूर्वीच गिरीश बापट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गिरीश बापट यांच्या अंत्ययात्रेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री

गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या पुण्यातल्या शनिवार पेठ या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. या वेळी अंत्यदर्शनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अंकुश काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते उपस्थित होते. स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते असे सगळेच गिरीश बापट यांना अखेरचा निरोप देण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत पोहचले होते. तसंच अंत्ययात्रेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख दिग्गज भाजपा नेत्यांचाही सहभाग होता.

गिरीश बापट यांचं पुण्यात निधन
गिरीश बापट यांना अखेरचा निरोप देताना भाजपाचे नेते

भाजपाचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. बापट यांच्या पार्थिवावर संध्याकाळी सातच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गिरीश बापट यांचं पुण्यात निधन
गिरीश बापट यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना शरद पवार

पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सर्वपक्षीय नेत्यांसोबत भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे एक वेगळेच स्थान राहिले आहे. नगरसेवक ते खासदारपदापर्यंत त्यांचा प्रवास हा थक्क करणारा राहिला आहे. राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी गिरीश बापट टेल्को कंपनीत कामगार म्हणून कामाला देखील होते. १९८३ ते २०२३ पर्यंत पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सक्रीय राहणारे गिरीश बापट तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार राहिले आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान बापट यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. २०१९ पासून ते पुणे लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत होते.