छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या धडकनाळ, बोरगाव परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. नऊ दिवसांपूर्वी लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे गाव-शिवार पाण्याखाली गेले होते. मात्र ते पाणी पूर्णपणे ओसरायच्या आत पुन्हा तुफान पावसाने पूराचा कहर केला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १०० मिलीमीटर पाऊस झाला.
जिल्हाभरात झालेल्या पावसाने मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा यासारख्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत होत्या.अनेक लहान नद्या-नाल्यांना प्रचंड पाणी आल्याने त्यांचे पाणी आजुबाजूच्या गावांमध्ये शिरले. लेंडी नदीच्या उपनद्याना पाणी आले ते पाणी धडकनाळ, बोरगाव या गावाच्या शिवारात आले.परिसरातील शेतं आणि घरे पुन्हा पाण्यात बुडाली आहेत.
गेल्या पूरातच या भागातील पूल वाहून गेले होते. त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. परंतु नव्या पुराच्या जोरदार लाटेला ते तग धरू शकले नाहीत आणि पुन्हा मोडून पडले आहेत. वाहतूक आणि संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
गावात अजूनही पाणी शिरलेले असून नागरिकांचे हाल वाढले आहेत. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडले आहेत. बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा येवा वाढला आहे. मांजरा नदी पात्रात ५२४१.४२ प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. मांजरा नदी काठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.