दहावीच्या निकालात पूर्वी वरच्या स्थानावर झळकणाऱ्या लातूर विभागाची या वर्षी मात्र शेवटच्या स्थानावर घसरण झाली आहे. लातूर विभागाचा निकाल राज्याच्या सर्वसाधारण निकालापेक्षा तब्बल १० टक्क्यांनी घसरला.
यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. विभागातून ९६ हजार २०४ विद्यार्थी परीक्षेस बसले. पैकी ७० हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ७३.७५ टक्के आहे. राज्याची उत्तीर्णतेची सरासरी ८३.४८ आहे. लातूर विभागातील निकालात लातूर जिल्हय़ाची उत्तीर्णतेची टक्केवारी ८१.२४, उस्मानाबादची ७७.४८ तर नांदेडची ६३.९२ टक्के आहे.
राज्यातील उत्तीर्णामध्ये नांदेड जिल्हय़ाचा तळाचा क्रमांक आहे. लातूर जिल्हय़ाचे उत्तीर्णतेचे मुलींचे प्रमाण ८२.५९, तर मुलांचे प्रमाण ८०.२२ टक्के आहे. उस्मानाबाद जिल्हय़ात मुलींचे ८०.१८, तर मुलांचे प्रमाण ७५.२१ आहे. नांदेडमध्ये मुलींचे ६४.९९, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ६३.०१ टक्के आहे.
तीन वर्षांपूर्वी (२०१०) कॉपीमुक्तीसाठी लातूर विभागाने मोठी मेहनत घेतली. कॉपीचा कलंक पुसून टाकण्यासाठी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक व शिक्षक या सर्वाचे प्रबोधन केले. त्या वर्षी दहावीचा निकाल राज्यात सर्वात कमी (४६.६९ टक्के) लागला. निकाल कमी लागला तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारेल, यासाठी प्रबोधन सुरूच ठेवले. त्यातून २०११मध्ये निकालाचे प्रमाण ६३.३३ टक्के होते. मार्च २०१२च्या परीक्षेत ते ६९ टक्के झाले आणि या वर्षी हे प्रमाण ७३.७५ टक्के आहे.
दरम्यान, दहावी व बारावीच्या निकालात सुमारे २० टक्क्यांचा फरक पडतो आहे. बारावीतील विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असला तरी वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत सर्वाधिक पात्र विद्यार्थी लातूरचेच असतात, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. मंडळाचे अध्यक्ष दिलीप सहस्रबुद्धे व सचिव शिशिर घोनमोडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना निकाल सांगितला.