छत्रपती संभाजीनगर : लातूर येथील रेल्वे कोच निर्माण कारखान्यात आतापर्यंत एक हजार जणांना रोजगार दिला आहे. पुढील वर्षात १० हजार रोजगार देता येऊ शकेल. त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कौशल्यविकास क्षेत्रातील यंत्रणांना बसून रोजगारक्षम मनुष्यबळ विकास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना नोकऱ्या मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवत लातूरच्या विकासासाठी रेल्वे डबे निर्माण कारखान्यासह लातूर पाणीपुरवठा आणि ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देत असल्याचे जाहीर केले.

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी लातूर येथे रेल्वे कोच फॅक्टरी सुरू करून ४० हजार जणांना नोकऱ्या दिल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. एक रेल्वे वाघीण केल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते मात्र, बऱ्याच वर्षांपासून हे काम पुढे सरकत नव्हते. लातूरच्या या रेल्वे कोच फॅक्टरीतून वंदे भारत रेल्वेसाठी लागणारे डबे तयार होतील, असे आश्वासन देण्यात येत होते. सोमवारी विश्रामगृहातील एका बैठकीत त्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. यात प्रकल्पाच्या मूल्य साखळीत दहा हजार रोजगार उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले.

कसा आहे रेल्वे कोच फॅक्टरी प्रकल्प

१२० वंदे भारत रेल्वे संच तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेला प्रकल्प

करारावर सप्टेंबर २०२३ मध्ये स्वाक्षरी केली. किनेट रेल्वे सोल्युशन, रशियाच्या ट्रान्समाशहोल्डिंग टीएचएम आणि भारताच्या आरव्हीएनएल यांच्यातील प्रकल्प

सद्य:स्थिती

एमआरसीएफ लातूर कारखान्यात डेमो कार बॉडीचे काम पूर्ण झाले असून, उत्पादन सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

स्थानिक कर्मचाऱ्यांसाठी क्षमताविकास कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षाविषयक सर्व प्रक्रिया हाती घेण्यात आल्या आहेत.

कधी होईल?

पहिला नमुना तयार करण्याची प्रक्रिया ऑक्टोबर २०२५ मध्ये होईल, असे सांगण्यात येत आहे.

किती रोजगार उपलब्ध होतील?

संपूर्ण मूल्य साखळीमध्ये १० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.

प्रकल्पाची किंमत किती?

करारानुसार हा प्रकल्प ६.५ अब्ज डॉलर एवढ्या किमतीचा आहे.