कराड : पुणे – बंगळुरू महामार्गाच्या सहापदरीकरणातील कराड ते नांदलापूर दरम्यानच्या नव्या नव्या उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरण्यात आलेले लॉन्चर मशीन उतरवण्याचेकाम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. मोठी तयारी करुन दोन लॉन्चर मशीन निर्विघ्नपणे उतरवण्यातही आल्या आहेत.

कराडजवळील ढेबेवाडी फाट्यावर ठेकेदार कंपनीने ही भलीमोठी लॉन्चर मशीन उतरवण्याची यंत्रणा उभी केली असून, या लॉन्चर मशीन उतरण्यासाठी लागणारी जम्बो क्रेन ढेबेवाडी फाट्यावरती दाखल होवून कार्यरतही झाली आहे. लॉन्चर उतरवण्यासाठी आठ ते पंधरा दिवस लागणार आहेत. त्यामुळे येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सध्याच्या वाहतूक व्यवस्थेमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन ठेकेदार अदानी व पोटठेकेदार डी पी जैन कंपनीसह पोलीस व प्रशासकीय यंत्रणेनेही केले आहे.

लॉन्चर उतरवण्याचे काम आठ ते पंधरा दिवस चालणार आहे. त्यासाठी कराडजवळील आणि मलकापूर शहरातील ढेबेवाडी फाटा येथील जागा निश्चित झाली आहे. हा परिसर अतिशय वर्दळीचा असल्याने प्रशासनाकडून आधी काय स्थिती होईल याची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या ठिकाणची चाचणी महिन्यापूर्वी पुर्ण झाली होती. आता प्रत्यक्ष लॉन्चर मशीन उतरवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

सेवा रस्त्यावरील वाहतूक उड्डाणपुलाखालून वळवण्यात आली आहे. विंग- चचेगाव- ढेबेवाडीकडून येणाऱ्या वाहनांनी पर्यायी म्हणजेच उड्डाणपुलाखालील मार्गाचा वापर करावा. तर, कराड शहरातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी कराड बैलबाजार मार्गे शिंदे मळा ते महामार्ग अशा रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत ठेकेदार कंपनीकडून ठिकठिकाणी सूचना फलकही लावण्यात आलेले आहेत. सध्या लॉन्चर उतरवण्याचे काम नियोजनबद्ध व यशस्वीपणे, विनातक्रार सुरू आहे.

लॉन्चर मशीन उतरवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत. पोलीस, वाहतूक विभाग, ठेकेदार व प्राधिकरण यांच्यातील समन्वयाने नागरिकांना व वाहतूकदारांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन निर्णय घेतले जात आहे.