अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणाऱ्या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. देखभाल दुरुस्ती अभावी महामार्गाची चाळण झाली असून रस्त्याला ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. वारंवार अर्ज विनंत्या करून रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने संतापलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आज पेण येथील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना शाल आणि श्रीफळ भेट दिली, आणि आता तरी रस्ता करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अलिबाग वडखळ महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अर्धा तासाचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहे. खराब रस्त्यामुळे महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, वाहन चालक आणि प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासकीय यंत्रणांचे लक्षवेधण्यासाठी आज अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय नेत्यांकडून प्रशासनाला निवदेन देण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मानसी म्हात्रे, प्रविण ठाकूर, विकास पिंपळे, शैलेश चव्हाण, प्रमोद घासे, आकाश राणे, निलेश पाटील, निखील मयेकर, दिलीप जोग यांच्यासह विवीध पक्षांचे नेते आणि स्थानिक उपस्थित होते. महामार्गावर पिंपळभाट, राऊतवाडी, वाडगाव फाटा, खंडाळा, मैनूशेठचा वाडा, तिनविरा, चरी, पेझारी ते पोयनाड आणि पांडबादेवी परिसरात महामार्गाला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा मार्ग वाहतूकीसाठी योग्य राहिलेला नाही, त्यामुळे स्थानिक नागरीक, पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हीबाब लक्षात घेऊन महामार्ग दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करावे अन्यथा सनदशीर मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला. यावेळी महामार्ग बांधकाम विभाग पेणचे उपकार्यकारी अभियंता संतोष शिगवण यांना शाल व श्रीफळ भेट देण्यात आले. आता तरी रस्ता करा लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान महामार्गाच्या मजबुतीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले असून यासाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम देवकर अर्थमुव्हर्स या कंपनीला देण्यात आले आहे. ईपीसी मोडवर रस्त्याचे मजबुतीकरण केले जाणार असून त्यासाठी कंपनीने मंजूर निधी पेक्षा ४३ टक्के कमी दराने निविदा भरली असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. हे काम तातडीने सुरु करण्यात येईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. खड्डे भरण्याचे काम उद्यापासूनच केले जाईल अशी हमी यावेळी देण्यात आली.