सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा एकदा गळती लागल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या गळती दुरुस्तीच्या कामामुळे बुधवार व गुरुवारी (दि. ६ व ७) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या काळात नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे. पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे आटाळी आणि कासाणी गावाजवळ जलवाहिनीला वारंवार गळती लागत असून या गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला मंगळवारी पुन्हा एकदा गळती लागली आहे. यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. अनेक भागात पाणी पोहचवण्यात अडचणी येत आहेत. यामुळे शहरात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. या कामामुळे बुधवार व गुरुवारी (दि. ६ व ७) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या काळात नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.
१८८६ पासून सुरू असलेल्या कास पाणीपुरवठा योजनेत १९९७ मध्ये सुधारणा झाली. मात्र, अजूनही जुनी जलवाहिनी वापरात आहे. पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे आटाळी आणि कासाणी गावाजवळ जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. या समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम लावण्यासाठी पालिकेने नवीन जलवाहिनीचे काम गतीने मार्गी लावले आहे.
या भागाचा पाणीपुरवठा बंद
बुधवारी : कास योजनेच्या माध्यमातून पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा आणि कात्रेवाडा टाकीतून होणारा सायंकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहील.
गुरुवारी : पॉवर हाऊस येथून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी आणि कोटेश्वर टाकीतून होणारा सकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.