भाजपाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. तर, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत.

कारण, पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र भाजपाने श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या रुपाने नव्या चेहऱ्यांना संधी देत एकप्रकारे दिग्गज नेत्यांना धक्का दिल्याचं बोललं जात आहे.

…त्यामुळे उमेदवारी मिळणार ही अपेक्षा होतीच – श्रीकांत भारतीय

पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत भारतीय यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, “भाजपा ही विचारांवर आधारित कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि त्यामुळेच राजकीय क्षमता, राजकीय धैर्य यासोबतच राजकीय कटिबद्धता, पक्षावरची श्रद्धा, निष्ठा याचा विचार हा पक्ष नेहमीच करतो. त्यामुळे आमच्यासारख्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाने संधी दिली आहे. भाजपामध्ये कार्यकर्त्यांची काळजी घेण्याचा संस्कार आहे, त्यामुळे उमेदवारी मिळेल हे अपेक्षित होतंच. भाजपामध्ये मला तरी आतापर्यंत जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीत मी पक्षाचं काम वाढवण्याचाच विचार केला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे अशाप्रकारची शक्ती जेव्हा पक्ष देतो, तेव्हा पक्षाच्या विकासासाठी, पक्षाच्या वाढीसाठीच माझी सगळी उर्जा मी खर्च करणार आहे. मी शेतकरी संघटनेचं काम केलं आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना कल्पना आहे, की या सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात सर्व शेतकऱ्यांचे हाल झाले आहे. त्यामुळे विधानपरिषदेत आता शेतकऱ्यांचा आवाज उठणारच आहे.”

श्रीकांत भारतीय हे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस असून, एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय भाजपाच्या किसान मोर्चाचे ते राष्ट्रीय कार्यकारणीत सदस्य देखील आहेत. २०१४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या वॉर रुमच्या प्रमुख पदाची धूरा देखील सांभाळलेली आहे.

उमा खापरे नेमक्या कोण आहेत ? –

उमा खापरे या भाजपाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात, शिवाय त्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष देखील आहेत. या अगोदर त्यांनी महिला मोर्चाचे प्रदेश सचिवपदासह अनेक महत्वपूर्ण पदं भूषवलेली आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगसेविका म्हणून त्यांनी काम उत्तमप्रकारे केले आहे. सलग दोनदा त्या नगरसेविका झालेल्या आङेत. शिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.

१९९७ ते २००७ या कालावधीत महानगरपालिकेवर नगरसेविका म्हणून त्या निवडून गेल्या होत्या. २००० ते २००२ मध्ये भाजपा महिला मोर्चा सचिव होत्या. तर, २००२ ते २०११ तीन टर्म भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस होत्या. याशिवाय २०१७ ते २०२० सोलापूरच्या प्रभारी होत्या. २०१९ पासून त्या भाजपा राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.