रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे गावात एका आंब्याच्या बागेत सात वर्षांचा नर जातीचा बिबट्या थेट फासकी तोडून एका ठिकाणी बसलेला ग्रामस्थांना दिसून आला. मात्र या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी वनविभागाकडून फासकी लावणा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फणसवळे येथील भगवान श्रीपत पाटील यांच्या आंबा कलमाच्या बागेत गुरखा फेरी मारत असताना बिबट्या जातीचा वन्यप्राणी फासकी तोडून फासकी सहित बागेत बसलेला दिसला. याबाबत तत्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे वनपाल पाली, वनरक्षक जाकादेवी, यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता बसलेल्या बिबट्याच्या कमरेला फासकी लागलेली दिसून आली. हा बसलेला बिबट्या फासकी तोडून आलेल्याचे  निदर्शनात आले. तसेच बिबट्या हा मोठमोठ्याने धापा टाकत  निपचित  पडला होता.

फणसवळे येथे दाखल झालेल्या वन अधिकाऱ्यांनी तात्काळ रेस्क्यू टीम व पिंजरा बोलवून घेतला. पिंजरा व जाळीच्या साहाय्याने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जागेवरच बेशुद्ध झाला. थोड्या वेळानंतर बिबट्याचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फासकीत सापडलेला बिबट्या मृत झाल्याने रत्नागिरी येथील झाडगाव पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले. मृत बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे सात वर्षे वयाचा होता. मृत शरीर सर्व अवयवासहित जाळून नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी वनविभागाकडून गुन्हा नोंद करण्यात आला असून ही फासकी कोठे व कोणी लावली याबाबत वन अधिकारी शोध घेत आहेत. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.