नवरगावच्या जंगलात जखमी बिबटय़ाचा मृत्यू

अधिवासक्षेत्र आणि स्वअस्तित्व कायम राखण्याच्या लढाईत जखमी झालेल्या बिबटय़ाला जीव गमवावा लागला. वडसा वनखात्याअंतर्गत बेळगाव क्षेत्रातील नवरगाव बीटमध्ये ही घटना घडली. कमरेपासून दोन्ही पायाने अपंग झालेल्या या बिबटय़ाला उपचाराकरिता गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्यादरम्यान नागपूर येथे आणण्यात आले.

अधिवासक्षेत्र आणि स्वअस्तित्व कायम राखण्याच्या लढाईत जखमी झालेल्या बिबटय़ाला जीव गमवावा लागला. वडसा वनखात्याअंतर्गत बेळगाव क्षेत्रातील नवरगाव बीटमध्ये ही घटना घडली. कमरेपासून दोन्ही पायाने अपंग झालेल्या या बिबटय़ाला उपचाराकरिता गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्यादरम्यान नागपूर येथे आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

स्वअस्तित्त्व अबाधित राखण्यासाठी फक्त माणसांमध्येच लढाई होते, असे नाही, तर वन्यप्राण्यांमध्येही होते. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनखात्याअंतर्गत बेळगाव क्षेत्रातील नवरगाव बीटमध्ये १२ नोव्हेंबरला सकाळी सात वाजता गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्याला दोन ते अडीच वर्षांचा बिबटय़ा जखमी अवस्थेत दिसून आला. सुस्थितीत नसला तरीही चालण्याच्या अवस्थेत असल्याने कर्मचाऱ्यांनी दिवसभर त्याच्या हालचालींवर लक्ष्य ठेवले. मात्र, १३ नोव्हेंबरला त्याला चालणेही अशक्य होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘बचाव पथका’ला पाचारण करण्यात आले. यातील सदस्यांनी त्याला ‘ट्रॅक्विलाईज गन’ने बेशुद्ध केले व त्यानंतर पशुवैद्यकांनी त्यावर उपचार सुरू केले. या बिबटय़ाच्या कमरेच्या वरच्या भागांवर वन्यप्राण्याच्या दातांच्या मोठय़ा खुणा दिसल्या. कमरेखालचे दोन्ही पायही लुळे पडले होते. उपचाराला फारसा प्रतिसाद मिळत नाही, असे लक्षात आल्यानंतर तातडीने त्याला नागपूर येथे सेमिनरी हिल्सवर आणण्यात आले.
रात्री सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान वनखात्याच्या डॉ. चित्रा राऊत, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, सहाय्यक वनसंरक्षक मेश्राम, कर्मचारी गुणवंत खरबडे आले. ११.३० वाजताच्या दरम्यान त्यावर उपचार सुरू करण्यात आले, पण बिबटय़ाची अवस्था अतिशय वाईट होती. रात्री तात्पुरत्या उपचारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इतर तपासण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याला घेऊन आलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी एम.के. गडवे यांनी पाहणी केली, तेव्हा बिबटय़ाची हालचाल सुरू होती. मात्र, शुक्रवारी सकाळी सहा वाजता बिबटा निपचित पडून असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा डॉ. चित्रा राऊत यांना बोलावण्यात आले. तपासणीत बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदनानंतर सेमिनरी हिल्स परिसरातील मृगविहारात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समोर येईल, पण अधिवासक्षेत्र अबाधित राखण्याच्या प्रयत्नात किंवा दुसऱ्या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी गडवे यांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leopard dies in nagpur

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या