वेकोलीच्या सिनाळा भूमिगत कोळसा खाणीतील खोल खड्डय़ात पडून पूर्ण वाढ झालेल्या एका बिबटय़ाचा मृत्यू झाला. वेकोलीच्या मातीच्या ढिगाऱ्यावरून हा बिबटय़ा या खड्डय़ात पडला असावा, असा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, नववर्षांतील ही पाचवी घटना आहे.
नववर्षांत १ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या ३८ दिवसात दोन वाघिणी व तीन बिबटय़ांचा मृत्यू झालेला आहे. १ जानेवारीला मुधोली येथे वाघिणीचा संशयास्पद मृत्यू, त्यानंतर ११ व १६ जानेवारीला उमरी पोतदार येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत्युमुखी पडली, तर १७ जानेवारीला जानाळा येथे विजेच्या खांबावर चढलेल्या बिबटय़ाचा मृत्यू झाला, तसेच २१ जानेवारीला वनराजीक महाविद्यालयामागे वेकोलीच्या मातीच्या ढिगाऱ्यांवर दोन बिबटय़ांची जोडगोळी दिसून आली. या प्राण्यांच्या संरक्षणाकडे वनखात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे बिबटय़ांच्या मृत्यूच्या घटना वाढत आहेत.