कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून, तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल, तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे देखील आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज(शनिवार) उद्योगांना केले आहे. तर, यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.

उद्योगांचा टास्क फोर्स तातडीने स्थापणार –
राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले. बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगीतले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढविणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरु करतील असेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फिकी, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधून राज्याला या काळात ज्या गोष्टींची गरज आहे त्यात पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. या बैठकीस उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल आदि उद्योगपती सहभागी होते.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या तसेच उद्योगपतींना कोविडविषयक सुविधा उभारण्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे सांगीतले. राज्य शासनाकडून मुख्य सचिव सीताराम कुंटे, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव सौरव विजय, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी अनबलगन आदींची उपस्थिती होती.

तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी उद्योगांनी नियोजन करावे –
ऑक्सिजनची राज्याला खूप गरज असून सध्या सर्व उत्पादित ऑक्सिजन वैद्यकीय कारणास्तव वापरला जात आहे. रुग्ण संख्या पाहता आणखी ऑक्सिजनची गरज भासत असून आपण पंतप्रधानांना देखील तसे कळविले आहे. कालही त्यांना संध्याकाळी संपर्क केला होतं मात्र ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याने बोलणे होऊ शकले नाही. मात्र केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य मिळते आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोविडच्या किती लाटा येतील ते आज सांगू शकत नाही मात्र आता राज्यातील उद्योगांनी सुद्धा येणाऱ्या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आत्तापासूनच करावे उदाहरणादाखल कोविड सुसंगत कार्यप्रणाली स्वीकारणे, चाचणी व लसीकरणाच्या सुविधा उभारणे, कामगार व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष यंत्रणा निर्माण करणे, आपल्या परिसरात विलगीकरण व्यवस्था उभारणे तसेच बेड्स उपलब्ध ठेवणे, वर्क फ्रॉम होमची यंत्रणा विकसित करणे, कामगारांच्या कामाच्या वेळांत तसे अनुरूप बदल करणे अशा सूचना त्यांनी दिल्या.

उद्योगांनी ऑक्सिजन उत्पादन करावे – डॉ. प्रदीप व्यास
डॉ.प्रदीप व्यास यांनी सध्याची परिस्थिती किती गंभीर होत आहे याकडे लक्ष वेधले. तुलनेने मृत्यू दर कमी असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या ४० दिवसांवर आला आहे हे सांगून ते म्हणाले की, आपण दहा लक्ष लोकसंख्येत दररोज सुमारे ३ लाख चाचण्या करीत आहोत. उद्योगांनी त्यांच्या आवारात नवीन तंत्रज्ञानावर आधारित हवेतील ऑक्सिजन शोषून उत्पादन करणारे छोटे प्रकल्प सुरु करावेत तसेच उत्पादित ऑक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी द्यावा असेही ते म्हणाले.

उद्योग उपलब्ध करून देणार ऑक्सिजन
बैठकीत सर्व उद्योगपतीच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात जेएसडब्ल्यू , महिंद्र, गोदरेज, बजाज, रिलायन्स, टाटा, ब्ल्यू स्टार,एल एंड टी , इन्फोसिस, कायनेटिक इंजिनीअरिंग यांच्या प्रतिनिधींनी बोलताना विशेषत: ऑक्सिजन उपलब्धता करून देण्यात येईल, तसेच त्यांच्या उद्योगांच्या परिसरात चाचणी केंद्रे उभारणे, लसीकरण मोहिमा घेऊन जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सुरक्षित करणे यासाठी तातडीने पाउले उचल आहोत असे आश्वासन दिले. अनेक उद्योगांनी त्यांच्या परिसरात विलगीकरण सुविधा उभारत असल्याचेही सांगितले.

यावेळी बोलताना मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील प्रमुख औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे येथील निर्बंधांचा संपूर्ण देशातील उद्योग- व्यवसाय आणि वितरण साखळीवर परिणाम होतो आणि म्हणूनच हे निर्बंध आम्ही अतिशय जड अंतकरणाने लावले आहेत. उद्योगांनी ऑक्सिजनची उपलब्धता त्वरेने करून देण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्धल त्यांनी धन्यवाद दिले तसेच एफडीए आयुक्तांनी पुढील कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lets be ready for the third wave too uddhav thackeray msr
First published on: 17-04-2021 at 16:20 IST