जखणगाव (ता. नगर) येथे सहकारी मजुराच्या डोक्यात दगड घालून खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा सत्र न्यायालयाने अवधूत विठ्ठल घाटे (वय १९, रा. काकडवस्ती, पुसद, जि. यवतमाळ) याला जन्मठेपेची शिक्षा दिली.
जिल्हा सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी गुरुवारी या खटल्याचा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता प्रकाश गायकवाड यांनी काम पाहिले. खटल्याच्या सुनावणीत एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. मृत व आरोपी यांना अखेरचे एकत्र पाहणारे साक्षीदार व परिस्थितिजन्य पुरावा ग्राहय़ मानून शिक्षा देण्यात आली.
आरोपी अवधूत घाटे व मृत पांडुरंग हिरामण पाटील (पिंपळी, धरणगाव, जळगाव) हे दोघे मजुरीच्या कामासाठी नगरच्या रेल्वेस्थानकावर आले होते. रावसाहेब आनंदा सोनवणे (जखणगाव) यांनी दोघांना शेतीच्या कामासाठी जखणगावला आणले. वैजीनाथ कर्डिले यांच्या शेतात त्यांनी बाजरीच्या काढणीचे काम केले. १६ डिसेंबर २०१२ रोजी दोघे हिंगणगावच्या यात्रेसाठी गेले, तेथे ते दारू प्यायले, मजुरीच्या कमीजास्त कामावरून दोघांत वाद झाले. पांडुरंग पाटील हा ओढय़ाच्या काटवनात सावलीखाली झोपला असताना अवधूत याने त्याच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह काटवनात टाकून दिला.
जखणगावच्या पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा खून केल्याच्या आरोपावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी मृतदेहाची ओळख पटवून अवधूतला अटक केली व दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life imprisonment one in colleague murder
First published on: 25-04-2014 at 03:33 IST