गुन्हेगार आणि त्यांची गुन्हे करतानाची कार्यपद्धती तपासून मराठवाडय़ातील आठही जिल्ह्यांत गुन्हेगारांचे आदान-प्रदान करण्यात येईल. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची ‘टॉप टेन’ यादी तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास नांदेड परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांनी पत्रकार बठकीत व्यक्त केला.
नांगरे हे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असून त्यांच्याकडे नांदेडचाही प्रभार आहे. मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्यांत जाऊन आढावा घेण्याचा मानस पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांचा दरबार घेऊन शहरातील नागरिक, व्यापारी यांच्याशी संवाद साधला. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बठकीत जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून गुन्हेगारी थांबविण्यासाठी व पोलीस अधिकारी चुकीचे करीत असतील, तर त्यावर पत्रकारांनी दबावगट म्हणून काम केले पाहिजे, असे नांगरे म्हणाले. क्षुल्लक कारणावरून जातीय तणाव निर्माण झाल्याच्या घटना यापूर्वी जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व अल्पसंख्य नागरिक यांच्यात सुसंवाद राहिला तर चांगले राहील, या बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून जनतेला चांगली वागणूक मिळावी, अशी सर्वाची अपेक्षा असते. तत्काळ तक्रार नोंदवून त्याचा एफआयआर तक्रारदाराला मिळाला, तर त्याचे समाधान होते. तक्रारदाराचे समाधान करण्याचे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
महिला सुरक्षेबाबत नांगरे म्हणाले की, प्रत्येक महिलेला पोलीस ठाणे माहेरघर वाटले पाहिजे. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा जिल्हा संवेदनशील असल्याने तरुण अधिकारीच देण्यात येतील, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक नियती ठाकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, संजय हिबारे उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2015 रोजी प्रकाशित
गुन्हेगारांची ‘टॉप टेन’ यादी करण्याच्या सूचना
गुन्हेगार आणि त्यांची गुन्हे करतानाची कार्यपद्धती तपासून मराठवाडय़ातील आठही जिल्ह्यांत गुन्हेगारांचे आदान-प्रदान करण्यात येईल. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची ‘टॉप टेन’ यादी तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
First published on: 30-05-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: List of top ten criminal