अकरा दिवसाच्या पाहुणचारानंतर स्वगृही निघालेल्या बाप्पाला गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला.  गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आणि ढोलताशा पथकांच्या तालावर गणरायाला निरोप दिला जात आहे. राज्यभरात वरूणराजानेही चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईत मधूनच मुसळधार पावसाची सर येत आहे. परंतु याचा कोणताच परिणाम गणेश भक्तांवर होताना दिसत नाही. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कुठे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व प्रशासन सज्ज झाले आहे. भांडूप, मुलूंड, सायन, माटुंगा, दादर, परळ, चेंबूर, कांजूरमार्ग, पवई, विक्रोळी येथे पावसाने हजेरी लावली. डीजे, डॉल्बीबरोबर पारंपारिक वाद्य ढोल, ताशे, झांज, लेझिमची पथके बाप्पाला वाजतगाजत निरोप देत आहेत. कोल्हापुरातील मानाचा गणपती तुकाराम माळी बाप्पाच्या मिरवणुकीस सकाळी ८.३० वाजता प्रारंभ झाला. यंदा कोल्हापुरात प्रशासनाने दिलेल्या डॉल्बीमुक्त मिरवणुकीला मंडळांनीही चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्याबरोबर लेझर शो, लाईटसचा मोठा वापर होत आहे. तसेच विविध नृत्यांचे सादरीकरण ही केले जात आहे. कोल्हापुरात मिरवणूक मार्गावर २६ सीसीटीव्ही लावले असून पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबीयांसह मुंबई महापौरांच्या निवासस्थानी बनवण्यात आलेल्या कृत्रिम तलावात आपल्या इकोफ्रेंडली बाप्पाचं विसर्जन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेश विसर्जनावेळी नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देत विसर्जन स्थळावर अस्वच्छता न करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही लेझिमवर ताल धरला. काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थिती आणि पुण्यातील दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईतील सुमारे ५० हजार पोलिस यावेळी बंदोबस्ताकरिता रस्त्यावर आहेत. तर यंदा प्रमुख चौपाटय़ांवर पोलिसांचे ‘ड्रोन’ कॅमेरे टेहळणीकरिता भिरभरत आहेत. या शिवाय सीसी टीव्हींचीही नजर विसर्जन मिरवणुकांवर आहे. महत्त्वाचे म्हणजे घातपाताची शक्यता लक्षात घेऊन आणि फ्रान्समधील ट्रक हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ट्रक चालकांची संपूर्ण माहिती देखील पोलिसांनी गोळा केली आहे.
Live Updates
08:23 (IST) 15 Sep 2016
मुंबई शहर परिसरात पावसाची हजेरी