नक्षलवाद्यांपासून धोका असल्याने इरपा उसेंडी पोलिसांच्या नजरकैदेत

राज्यपाल, मुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी लॉयड मेटल्स प्रकल्प कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू करण्याचे जाहीर करताच सूरजागड घटनेची मुख्य सूत्रधार व  नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीची सदस्य आणि पश्चिम सब झोनल समितीची सचिव नर्मदाक्का, जहाल नक्षलवादी कमांडर साईनाथ व भास्कर यांनी लॉयड व पोलिसांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. इरपा उसेंडी याच्या जीवाला नक्षल्यांकडून असलेला धोका बघता तो पूर्णवेळ पोलिसांच्या नजरकैदेत आहे. सूरजागड खाणीवरून संघर्ष चांगलाच चिघळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूरजागड पहाडावर २३ डिसेंबरला ८० ट्रक जाळल्याच्या घटनेची प्रमुख सूत्रधार जहाल नक्षलवादी नर्मदाक्का होती. तिच्याच निर्देशानंतर नक्षलवाद्यांनी ट्रक जाळले. या घटनेनंतर लॉयड मेटल्सने लोह उत्खनन बंद केले असले तरी उत्खनन पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात कंपनीवर राज्य व केंद्र सरकारचा दबाव वाढत असल्याची माहिती आहे. मात्र, कुठल्याही संरक्षणाशिवाय कंपनी उत्खनन करायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण कंपनीने उत्खनन सुरू केले तर नक्षलवादी पुन्हा ट्रकची जाळपोळ करतील. केवळ जाळपोळच नाही तर यावेळी नक्षलवादी ट्रकचालक तथा मजुरांची हत्याही करतील. कारण नक्षलवाद्यांनी तसा इशाराच लॉयड मेटल्स कंपनीला दिलेला आहे. ही स्थिती असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गडचिरोली दौऱ्यात कडक सुरक्षा व्यवस्थेत काम पूर्ववत सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्हा व पोलिस प्रशासन तसेच लॉयड मेटल्स कंपनी उत्खनन पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहेत काय, यावर जहाल नक्षलवादी  लक्ष ठेवून आहेत. केवळ नर्मदाक्काच नाही तर जहाल नक्षलवादी साईनाथ व भास्कर या संपूर्ण घटनेच्या मागे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता जर उत्खनन सुरू झाले तर एखादी मोठी घटना नक्कीच घडेल अशीही माहिती सूत्रांनी दिली.

सूरजागड व परिसरात ज्या प्रकारे पोलिसांचे खबरे तैनात आहेत, त्याच प्रकारे नक्षलवाद्यांचेही खबरे प्रत्येक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवित आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉयड मेटल्स कंपनी आाणखी जोखीम घेण्यास तयार नाही. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त दिला तर एकवेळ काम सुरू करू अन्यथा शांत बसण्यातच हीत आहे असा पावित्रा कंपनीचा आहे. तर पोलिस कंपनीने पैसे भरल्याशिवाय सुरक्षा देण्यास तयार नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, जाळपोळ प्रकरणी यापूर्वीच पोलिसांनी नर्मदाक्का, साईनाथ व भास्कर यांच्यासह सातजणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे नक्षलवादी संतापले असून पोलिस व प्रशासन खाणीला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांची भूमिका का समजून घेत नाही, असाही निरोप नक्षलवादी पोलिसांपर्यंत पाठवित आहेत. मात्र, त्यालाही पोलिस दल व प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि वारंवार सूरजागड प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातच बैठका होत असल्यानेही नक्षलवादी संतापले आहेत. तिकडे इरपा उसेंडीच्याचे जीवाला नक्षलवाद्यांकडून धोका आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे.