जीवनाश्यक वस्तू विक्रीसाठी सकाळी सवलत

परभणी/ लातूर : करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी कालावधीत पुन्हा १ जूनपर्यंत वाढ केली असून याबाबत रविवारी (दि. १६) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि बी. पी. पृथ्वीराज यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.  दरम्यान, जीवनाश्यक वस्तूसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

किराणा, भाजीपाला व फळ विक्रीस सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे. मात्र इतर सर्व दुकाने आस्थापना व पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. बँकामधील ग्राहकांसाठी सेवा नेहमीच्या वेळेप्रमाणे सुरू राहील तसेच कृषी अतंर्गत सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच औद्योगिक कारखान्यातील काम, ई कॉमर्स सेवा, स्वस्तधान्य दुकाने, घरपोच पिण्याचे पाणी, लसीकरण किंवा अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे.

विभागीय आयुक्तांची ‘करोना सेंटर’ला भेट

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी परभणी जिल्ह्यातील कौसडी या गावातील करोना केअर सेंटर ला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी प्राणवायूसह सर्व अद्यावत यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी शंकर देशमुख यांना सूचना दिल्या. तसेच भविष्यातील येणारी तिसरी लाट लक्षात घेता तत्काळ उपाययोजना कराव्यात व ग्रामीण भागातील रुग्णांना गावातच सर्व आरोग्य सुविधा मिळाव्यात, असेही त्यांनी सांगितले. या वेळी प्रभाकर पाटील वाघीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण बकान, डॉ. अनंत दहिवाल तसेच हरिभाऊ खैरे, अकबर पठाण आदी उपस्थित होते.