पुणे : ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, ते लोक तुम्हाला दमदाटी करत असतील. मात्र, तुम्ही चिंता करू नका. शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील. कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू शकतो, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधकांना प्रचार सांगता सभेत इशारा दिला.

पवार यांनी भोर, इंदापूर आणि बारामती येथे जाहीर सभा घेतल्या. लोकसभा निवडणुकांसाठीची यंदाची ही बारामतीमधील शेवटची सभा आहे, आपण दरवर्षी शेवटची सभा ज्या प्रांगणात घेतो, ती जागा यंदा सत्ताधाऱ्यांनी ताब्यात घेतली. पण, कुणी जागा अडवली म्हणून आपले काही नुकसान होऊ शकत नाही. सातत्याने भाषण केल्याने घसा बसला असतानाही आणि तोंडातून शब्द फुटत नसतानाही पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीमधील सभेत काही वेळ भाषण केले. त्यांनी भाषण आटोपते घेताच, उपस्थितांनी पवारांचा जयघोष केला. बारामतीमधील सभेत सुप्रिया सुळे यांनी गेल्या दहा वर्षांत मी काहीच काम केले नाही, हा आरोप मला मान्य नाही. मात्र, या आरोपांना मी फार उत्तर देणार नाही, कारण सत्य त्यांनाही माहिती आहे. येत्या सात तारखेला बारामतीकरांच्या सेवेची संधी देण्यासाठी पुन्हा चौथ्यांदा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

दम दिला असता तर २५-३० वर्षे निवडून आलो असतो का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

बारामती/ इंदापूर : मी लोकांना दम दिला असता, तर मला २५-३० वर्षे बारामतीकरांनी निवडून तरी दिले असते का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ज्यांना आपण १५ वर्षे खासदार केले, पण या कार्यकाळात केंद्राचा निधी बारामती लोकसभा मतदार संघात येऊ शकला नाही. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका करून आणि संसदरत्न मिळवून बारामतीचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बारामती येथे झालेल्या प्रचार सांगता सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी कोणाचेही नाव न घेता वैकक्तिक टीका करणाऱ्यांना इशारा दिला.

ते म्हणाले की, महिला लोकसभेवर गेल्यानंतर त्यांचा नवरा काय पर्स घेऊन जाणार का? अशी टीका करण्यात आली. आपण लोकसभेवर गेल्यावर आपले पती पर्स घेऊन जातात काय? सुनेत्रा पवार या खासदार झाल्यावर मी काय पर्स घेऊन जाणार काय? मी बोलायला लागलो, तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. थेट मुंबईच गाठाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांचे यंदा बारामतीत मतदान मंगळवारी (७ मे) शरद पवार हे बारामती तालुक्यातील माळेगाव येथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याआधी पवार हे मुंबईत मतदान करत होते.