सतीश कामत

कोकणच्या धार्मिक-सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य अंग असलेला कोकणचा गणेशोत्सवदरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पार पडत असला तरी करोनामुळे या उत्सवातील चैतन्य हरपल्याचा अनुभव येत आहे.

गणरायाच्या स्वागतासाठी दरवर्षी सुमारे दीड-दोन लाख नोकरदार रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांमध्ये येत असतात. यंदा जेमतेम पन्नास हजार आल्याची नोंद सरकारदरबारी झाली आहे. करोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध, हे त्याचे वरकरणी कारण आहे. उरलेले सुमारे लाखभरापेक्षा जास्त नागरिक गेल्या मे-जूनपासून गावीच तळ ठोकून आहेत. या परिस्थितीमुळे यंदा काहीजण इकडे न येता शहरातील घरीच उत्सव साजरा करत असले तरी त्यामुळे जिल्ह्य़ातील घरगुती गणपतींच्या संख्येत घट झालेली नाही. दरवर्षीप्रमाणे सुमारे १ लाख ६६ हजार गणपतींची जिल्ह्य़ात घरोघरी प्रतिष्ठापना झाली असून गतवेळच्या तुलनेत ही संख्या जास्तच आहे. पण टाळेबंदीमुळे अनेकांना गेले काही महिने कामधंदाच नसल्याने घरी येणाऱ्या या आवडत्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सजावट, रोषणाई आणि दरदिवशीच्या बदलत्या प्रसादाची हौस भागवायला खिशात फार पैसा खुळखुळत नव्हता. त्यामुळे उत्सवात परिस्थितीने लादलेला साधेपणा आला आहे.  याचबरोबर, गावात प्रत्येकाच्या घरी स्वतंत्रपणे गणपती बसत असला आणि पूजा-अर्चा होत असली तरी संघ्याकाळची आरती मात्र टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर सामूहिकपणे होत असते आणि त्यासाठी वाडीतले सारेजण रात्री उशिरापर्यंत जथ्थ्याने घरोघरी फिरत असतात. यंदा मात्र केवळ रिवाज म्हणून, मोजके पाच-सहाजण प्रत्येक घरी जाऊन, अतिशय निरुत्साही वातावरणात हा सोपस्कार पार पाडला जात आहे आणि ठाय लयीतील भजने किंवा ढोलकी-घुंगरांच्या ठेक्यावरील जाखडी नृत्ये तर अदृश्यच झाली आहेत.

बाहेरगावाहून येणाऱ्या नोकरदारांमुळे करोनाचा आणखी फैलाव होईल, ही भीती मात्र अनाठायी ठरली आहे. उलट, गेल्या काही दिवसांत नव्याने करोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटू लागले आहे. मंगळवारी घरोघरी गौरी आल्या असून बुधवारी त्यांच्या पूजन-भोजनाचा सोहळा आहे. काही ठिकाणी हे भोजन सामिष असते. वाडीतील मंडळी जास्त हौशी असतील तर कोंबडी वडय़ांवर न भागवता वर्गणी काढून बोकड खरेदी केला जातो आणि वाडीत आणून वाटे घातले जातात. यंदा गावोगावी चाकरमानी मोठय़ा संख्येने असल्याने या बोकडांना मात्र, जागेवर तीनशे-साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे मागणी आहे.

कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण अत्यल्प असते. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्य़ात मिळून फक्त ११२ सार्वजनिक उत्सव आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा काही प्रश्नच नसतो. पण करोनामुळे घरगुती सणालाही रया उरलेली नाही. जिल्ह्यातील दीड दिवसाच्या सुमारे १० हजार घरगुती गणपतींचे गेल्या रविवारी विसर्जन झाले. उरलेल्या सुमारे दीड लाख गणपतींचे गुरुवारी विसर्जन होईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी नगर परिषदांनी यंदा प्रथमच कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

चिपळूणमध्ये तर पाण्याच्या मोठय़ा टाक्या असलेल्या गाडय़ा विसर्जनाच्या दिवशी शहरात फिरणार आहेत. अशा अकल्पनीय वातावरणात कोकणचा हा वार्षिक उत्सव कसाबसा पार पडणार आहे आणि  यंदाच्या वर्षी न करता आलेली हौस-मजा पुढच्या वर्षी तरी दणक्यात होईल, अशी आशा उराशी बाळगत कोकणवासी आपल्या लाडक्या दैवताला निरोप देणार आहेत.