Madha MLA Abhijeet Patil at Maharashtra Assembly Monsoon session : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (१० जुलै) नववा दिवस असून आज राज्यभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधी आमदारांनी कृषीमंत्र्यांना धारेवर धरलं. दरम्यान, द्राक्ष बागायतदारांच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं.
माढ्याचे आमदार अभिजीत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष) यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना म्हणाले, “आमच्या सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मागील दोन अधिवेशनांमध्ये आम्ही हा मुद्दा मांडला. अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. कृषीविभाग त्यांच्याकडे दुर्लक्ष का करतोय?” यावर कोकाटे म्हणाले, “प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शेतकऱ्यांना मदत कशी देणार?”
द्राक्ष बागांच्या विषयावर आम्हाला विधानसभेत बोलू दिलं पाहिजे : पाटील
अभिजीत पाटील म्हणाले, “आमच्या सोलापूर जिल्ह्यात २०,४०० हेक्टरवर द्राक्षपिके आहेत. त्यामुळे द्राक्ष बागांच्या विषयावर आम्हाला विधानसभेत बोलू दिलं पाहिजे.” यावर सत्ताधारी बाकावरील काही आमदारांनी पाटलांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावर पाटील म्हणाले, “पवारसाहेब, तुमच्या जिल्ह्यात द्राक्षपिके नाहीत. द्राक्षे आमच्या जिल्ह्यात आहेत. तरी तुम्ही आम्हाला का बोलू देत नाही? हे चालणार नाही. तुम्ही सत्तापक्ष म्हणून मनमानी कारभार करणार का?”
“२०,४०० हेक्टरवर द्राक्षपिके, नुकसानभरपाई मात्र ३३ हेक्टरवरील पिकांना”
“आमच्या जिल्ह्यात २०,४०० हेक्टरवर द्राक्षपिके पसरली आहेत. बहुसंख्य शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं आहे. मात्र, केवळ ३३ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानाची भरपाई मिळाली आहे. आमच्या जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी अडचणीत आहे. याविषयी आम्ही मागील दोन्ही अधिवेशनांमध्ये मुंद्दा मांडला. मात्र, नुकसानभरपाई मिळाली नाही. हे सरकार विमा कंपन्यांना पाठीशी का घालतंय?”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ज्यांनी अर्ज केले नसतील त्यांना भरपाई कशी देणार? कोकाटेंचा सवाल
यावर उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, “अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यांनी सरकारकडे अर्ज केले त्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले आणि नुकसानभरपाई देण्यात आली आहे. किती भरपाई दिली याची शासनाकडे आकडेवारी आहे. मात्र, ज्यांनी अर्जच केले नसतील त्यांना नुकसानभरपाई कशी देणार? विमा कंपनी त्यांना कशी ग्राह्य धरणार.”