सावंतवाडी : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवलीचे माजी आमदार यशवंतराव बाबाजी दळवी (वय १००) यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. वैद्यकीय सेवा करताना य.बा. दळवी यांनी समाजसेवेचा वारसाही जोपासला होता.
सन १९६२ मध्ये ते कणकवली मतदारसंघातून प्रजासमाजवादी पक्षातून निवडून आले. तर १९७८ मध्ये मालवण मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर निवडून आले होते. बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती.
सन १९५३ मध्ये वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते मुंबईत न राहता थेट आपल्या कळसुली गावात येवून वैद्यकीय सेवा सुरू केली होती. आमदार असेपर्यंत आणि त्यानंतरही त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू ठेवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी साधना, मुलगा रणजित, कन्या कल्पना कदम, दीपा मोरे, सुप्रिया मुलचंदानी तसेच नातवंडे असा परिवार आहे.