सातारा : महाबळेश्वरला आज पहिला पाऊस आला. हिरव्यागार निसर्गावर धुक्याने सुंदरशी चादर घातली. यामुळे महाबळेश्वरचा निसर्ग चांगलाच फुलला. पर्यटकांनी या बदलत्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला.महाबळेश्वरला आज पहिलाच पाऊस झाला. महाबळेश्वरला सध्या मोठ्या संख्येने लोक सहलीवर आले आहेत. शाळेला सुटी असल्याने लहान-मोठे, वयोवृद्ध असे सर्व कुटुंबासह देशभरातून पर्यटक महाबळेश्वरला येत आहेत. आज सकाळपासून महाबळेश्वरला खूपच चांगले आल्हाददायक वातावरण होते.

दुपारी अचानक ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस झाला. या पावसाने हिरवागार निसर्ग एकदम फुलला आणि काश्मीरसारखी बर्फाची चादर पसरावी तसा धुक्याच्या चादरीने संपूर्ण निसर्ग झाकला गेला. पर्यटकांनी पावसात भिजण्याचा आणि बदलत्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांसाठी खूपच चांगले वातावरण आहे. पर्यटकांची ही मोठी गर्दी आहे. दिवसभर वेगवेगळे पॉइंट पाहिल्यानंतर संध्याकाळी आपोआप पावले वेण्णा लेककडे वळत आहेत. वेण्णा लेक येथे बोटिंग झाल्यानंतर त्याच परिसरात वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. घोडेस्वारीलाही सध्या चांगले दिवस आहेत. त्यामुळे बोटिंग आणि घोडेस्वारीचा आनंद पर्यटक घेत आहेत. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे.

एकूणच भरलेल्या पर्यटनामुळे महाबळेश्वरचे व्यावसायिक खुशीत आहेत. पर्यटकही सहलीचा आनंद घेत धम्माल करत आहेत. आज महाबळेश्वरला पाऊस झाल्याने सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे हिरव्यागार निसर्गावर बर्फ पडत असल्याचा भाव पर्यटकांना होत होता. त्या वेळी पर्यटकांनीही या बदलत्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला. पावसामुळे हवामान एकदम बदलले. सायंकाळी वातावरणात थंडी दाटून आली. संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र दिसत होता. एकूणच महाबळेश्वर पहिल्या पावसाने एकदम सुंदर फुलले आहे.