सातारा : महाबळेश्वर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे महाबळेश्वर शहरात आज ३२.६० मि.मी. पाऊस झाला आहे. १ जूनपासून महाबळेश्वरमध्ये १२२३.४० मि.मी. (४८.१६५इंच) पाऊस पडला आहे. दरम्यान जिल्ह्यात पडणाऱ्या या पावसामुळे कोयना, धोम, कण्हेर, बलकवडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या पंधरवड्यापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने नुकताच हजार मिलिमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. जोरदार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील नद्या, नाले, ओढे, धबधबे भरून वाहू लागले आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयना व कण्हेर धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून वीजनिर्मिती सुरू आहे. कोयना आणि वेण्णा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव (लेक) भरून वाहत असल्याने कण्हेर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
वेण्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने सातारा तालुक्यातील हमदाबाद, किडगाव व करंजे म्हसवे (ता. सातारा) पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठावरील गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दक्षिणेच्या भागातील पाणी कोयना व पूर्वेकडील वेण्णा नद्यांमध्ये जाते. उत्तरेकडील पाणी हे कृष्णा नदीत येते. कृष्णा नदीवर बलकवडी धरण आहे. चार टीएमसी क्षमता असलेले बलकवडी धरण भरल्यानंतर त्यातील पाणी कृष्णा नदीद्वारे धोम धरणात सोडण्यात येते. सध्याच्या पावसामुळे बलकवडी धरणाची पाणी पातळी वाढली आहे. धोम धरणाचे पाणलोट क्षेत्र विस्तीर्ण असे आहे. जांभळी खोऱ्यातील वाळकी नदीचे पाणीही या धरणात येते. महाबळेश्वरच्या पावसामुळे कोयना, धोम, कण्हेर, बलकवडी धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.