महाबळेश्वर-पाचगणी परिसरात पावसाळा पूर्व वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मिळेल त्या मार्गाने मोठ्यासंख्येने येत आहेत. महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या पॉईंटवर पर्यटकांनी छोटी मोठी गर्दी केली आहे. महाबळेश्वर,पाचगणी,पसरणी घाटाच्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद पर्यटक घेत आहेत. निर्बंध शिथिल झाल्यामुळे आज मर्यादित परंतु पर्यटकांनी चांगलीच हजेरी या परिसरात लावली.

थंड गार हवा, पावसाची रिप रिप आणि पडलेल्या घनदाट धुक्यातुन रस्ता निसर्गाचा आणि वेगवेगळ्या पॉईंटचा शोध घेत पर्यटक महाबळेश्वरात दाखल झाले आहेत. सातारा जिल्ह्यात नुकतीच टाळेबंदीचे काही निर्बंध शिथिल केले आहेत. वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनीही महाबळेश्वर,पाचगणी वाईचे प्रतिबंधित क्षेत्र कमी करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आज पुणे, मुंबई,-नाशिक, कोल्हापूर परिसरातील पर्यटकांनी हजेरी लावली. यामध्ये पुण्यातील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.पर्यटकांची संख्या मर्यादित असली तरी पर्यटकांना पाहून स्थानिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

महाबळेश्वर बाजारपेठेत पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. अजूनही हॉटेल रेस्टॉरंट लॉज सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली नसल्याने बाजारपेठ संपुर्णतः बंद आहे. स्थानिक नागरिकांची पावसाळ्यापूर्वीची घराला झड्या लावणे, घरे उबदार राहतील या दृष्टीने कामे सुरू आहेत. पावसाळ्यात घरे गळू नयेत म्हणून प्लॅस्टिकचे आच्छादन करण्याचे कामही सुरू आहे.

स्थानिक नागरिक पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी सगळे ते प्रयत्न करत आहेत. गुरेघर येथे खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी झालेली आहे. मॅप्रो गार्डन परिसरातील गर्दी पाहून टाळेबंदी शिल्लकच नाही अशी परिस्थिती दिसून आली. मागील महिनाभरात महाबळेश्वर पाचगणी वाई परिसरात नियमित पाऊस झालेला असल्यामुळे निसर्गाचे हिरवेगार रूप दिसत आहे. एकूणच सध्या या परिसरातील वातावरण आल्हाददायक असून आहे. ऊन-पावसाच्या खेळात अचनाक धुके दाटून आल्यानंतर पर्यटकांना काही काळ पुढचं दिसतच नाही अशी स्थिती आहे. परंतु याचाही आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत. आज रविवारी वीकेंड निमित्ताने बऱ्यापैकी गर्दी या परिसरात दिसून आली.