पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांचे वक्तव्य

धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी मंत्री झालो नाही. बारामती लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने मला मते दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो, असे धक्कादायक विधान पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी येथे केले.

धनगर समाजाला आरक्षण देण्यास अनेक कायदेशीर अडचणी येत आहेत. त्या पूर्ण करून धनगर समाजाला आरक्षण देण्यास मी कटिबद्ध आहे. मात्र याच वेळेस बोलताना मला केवळ धनगर समाजाचा मंत्री म्हणून जखडून ठेवू नका असे म्हणत त्यांनी वरील विधान केले.धनगर समाजामुळे, धनगर आरक्षणामुळे मंत्री नाही. बारामती लोकसभा निवडणुकीत मला ब्राह्मण, मराठा बांधवांनी मते दिली. मात्र धनगर समाजाने मते दिली नाहीत. धनगर समाजाने मते दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो, असे वक्तव्य जानकर यांनी केले.

धनगर समाजाला आरक्षण देण्यास कोणतीही घाई करणार नाही, असे सांगताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला. पृथ्वीराज चव्हाण यांनी घाई गडबड केली आणि मराठा आरक्षण आता रखडले आहे. अशी परिस्थिती धनगर आरक्षणाच्या बाबतीत होऊ नये असे जानकर म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. शेट्टी आणि राज्यमंत्री खोत यांच्यातील वाद मिटावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.